

The Shiv Sena-BJP alliance broke up at the last moment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुका युतीत लढण्याचा निर्णय शिवसेना-भाजपकडून घेण्यात आला. त्यानुसार जागा वाटपातही दोन्ही पक्षांचे एकमत झाले. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात अधिकृत एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे करण्यात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित जागांवर पक्षाच्याच अपक्षांना पुरस्कृत उमेदवार करून दोन्ही पक्षांकडून युती तुटली यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युती तुटली होती. यात शिवसेनेला भाजपने कमी जागा दिल्याने संतापलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीत भाजपने ९२, तर सेनेने सर्वाधिक ९७ ठिकाणी उमेदवार दिले. परंतु या निवडणुकीत भाजपने ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले. स्पष्ट बहुमतापासून भाजप केवळ एक नगरसेवक कमी राहिला.
त्यामुळे जिल्हा परिषद दोघांनी युतीत लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व रणनीतीही ठरविली गेली. जागा वाटपात ६४ गटांपैकी सिल्लोड-सोयगाव वगळून सेनेला २५ गट आणि भाजपला २७ गट देण्यात आले. युतीचे ठरल्यानंतरही ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेनेने काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना भाजप उमेदवारांविरोधात एबी फॉर्म दिले.
त्यावर भाजपनेही सेनेच्या विरोधात काही उमेदवारांना अधिकृतरीत्या एबी फॉर्म दिले. उमेदवारी माघारीवेळी पालकमंत्री शिरसाट यांच्यासोबत चर्चा करून युती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे मंत्री सावे म्हणाले होते. परंतु मंगळवारी (दि. २७) उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी सेनेने भाजपविरोधातील उमेदवारांना माघार घेण्याची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे भाजपनेही तीच भूमिका ठेवली. त्यानंतर ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांना आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देणे शक्य झाले नाही, तेथे पक्षाच्याच अपक्षांना पाठिंबा दर्शवून पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले.