

Due to strike, revenue work has stopped
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांना शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी १२ सप्टेंबरपासून नागपूर येथे महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सिल्लोड तालुक्यातील महसूल सेवक सहभागी झाले आहेत. परिणामी दैनंदिन महसुली कामकाज ठप्प झाले आहे. तहसील कार्यालयातील जवळपास सर्वच कक्षांमध्ये रिकाम्या खुर्चा असून शुकशुकाट आहे.
संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर पदाधिकारी दुर्गेश गिरी, राजू पवार, राजेश बसय्ये, अमोल निकम व सुधाकर कासारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महसूल सेवक हे शासनाच्या विविध योजना, प्रमाणपत्रे, जनगणना, निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन, टंचाई उपाययोजना अशा महत्त्वाच्या कामकाजात थेट सहभागी असूनही त्यांना अद्याप शासकीय सेवकांचा दर्जा मिळालेला नाही.
या अन्यायाविरुद्ध महसूल सेवकांनी १० सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम, ११ सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर धरणे आंदोलन यानंतर नागपूर येथे बेमुदत धरणे सुरू केले आहे. कामबंद आंदोलनामुळे ई-पीक पाहणी, महसुली वसुली, प्रमाणपत्रे वाटप तसेच ङ्गमहसुली पंधरवडा अंतर्गत सुरू असलेली कामे थांबली असून सामान्य नागरिकांसह महसूल विभागाचे नियमित कामकाज विस्कळीत झाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील सर्व महसूल सेवक बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाल्यामुळे महसुली वसुली, ई-पीक पाहणी, प्रमाणपत्रे वाटप आणि महसुली पंधरवडा यासारखी महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. या आंदोलनामुळे दैनंदिन महसुली कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.