

Drunken driver loses control.
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा घाटात मद्यधुंद अवस्थेत हायवा ट्रक चालविणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट खोल दरीत घसरल्याची घटना गुरुवारी (दि.१४) दुपारी घडली.
सुदैवाने सुरक्षा कठड्यात ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली असून चालक बालंबाल बचावला आहे. याप्रकरणी चालक अंकुश नारायण शिंदे (वय ३२, रा. अंभई, ता. सिल्लोड) याच्याविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हायवा ट्रक (एम एच २० जी सी २०९९) हा जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अजिंठा घाटातील पहिल्याच वळणावर समोरून आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हायवा रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीच्या दिशेने घसरत जंगलात उतरला.
मात्र, सुरक्षा कठड्यात ट्रक अडकल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलिस अंमलदार आकाश गवळी व फिरोज तडवी करीत आहेत.