

Drugs Smuggled from Mumbai; Gang Busted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
गुन्हे शाखेने आणखी एका ड्रग्ज तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत ४९.३१ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. या कारवाईत दोन सख्ख्या भावांसह चार तस्करांना बुढीलाईन भागात शनिवारी (दि. २८) बेड्या ठोकल्या.
सोहेल मेहमुद शेख (२४, रा. उस्मानपुरा), सलमान मेहमुद शेख (२६, रा. बुढीलाईन), अब्दुल रहेमान अदनान हिलावी (२६, रा. किराडपुरा), शेख जुनैद अब्दुल रऊफ (२३, रा. किराडपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी रविवारी (दि.२९) दिली.
अधिक माहितीनुसार, आरोपी सलमान हा त्याच्या साथीदारांसह बुढीलाईन भागात ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने नेहरू भवन समोरील पाशा हॉटेलच्या गल्लीत सापळा रचला. तेथे आरोपी ड्रग्जच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असतानाच पोलिसांनी झडप घालून चौघांना ताब्यात घेतले.
सोहेलच्या अंगझडतीत ४९.३१ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. तर अन्य तिघांकडे रोख रक्कम, व मोबाईल असा १० लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, एपीआय रविकांत गच्चे, पीएसआय कदम, वाघ, हवालदार योगेश नवसारे, राजेंद्र साळुंके, विजय निकम, योगेश गुप्ता, अशरफ सय्यद, मनोहर गीते, योगेश यमदळ, राहुल बंगाळे आदींच्या पथकाने केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बुधा शिंदे करत आहेत.
आरोपी सलमान हा पूर्वी एका चप्पलच्या दुकानावर काम करत होता. शहरात सिरप, बटन, ड्रग्जविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडल्याने माल मिळणे नशेखोरांना कठीण झाले होते. याच संधीचा फायदा घेत सलमानने भाऊ सोहेलसोबत मिळून पैसे कमविण्यासाठी ड्रग्जचा धंदा सुरू केला.
चार महिन्यांपासून ड्रग्ज तस्करी आरोपी सलमान शेख आणि त्याचा भाऊ सोहेल हे गेल्या चार महिन्यांपासून मुंबईच्या फरहान नावाच्या व्यक्तीकडून ड्रग्ज मागवून शहरात धंदा चालवत होते. मुंबईहून माल आणल्यानंतर हे दोघे भाऊ १ व अर्धा ग्रॅमच्या पुड्या तयार करून सलमान शेख अब्दुल रहेमान सोहेल शेख शेख जुनैद अब्दुल आणि जुनैदच्या मदतीने त्याची विक्री करत होते. चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.