

Drug addicts attack laborers for money in Bambatnagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ड्रेनेजलाईनचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना दारूसाठी पैशाची मागणी करत नशेखोराने हल्ला चढविला. छातीवर फुटलेल्या काचेच्या बाटलीने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेपटरीजवळ, बंबाटनगर येथे घडली.
विशेष म्हणजे या ठिकाणी नेहमीच नशेखोर नागरिकांवर हल्ले करत असताना पुंडलिकनगर पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. फिर्यादी पप्पू चितू भुरिया (३७, रा. मूळ मध्यप्रदेश, ह.मु. सावंगी बायपास) हा त्याच्या सहकारी मजुरांसोबत बंबाटनगर भागात ड्रेनेजलाईनचे काम करण्यासाठी गेला होता.
काम करत असताना तो रेल्वेपटरीजवळ लघुशंकेला गेला. तिथे काही लोक बसलेले होते. त्यातील एका नशेखोराने तू मुझे दारू पिणे को पैसे दे, अशी मागणी केली. त्याला पैसे नाहीत, असे म्हणताच त्याने काचेची फुटलेली बाटली घेऊन थेट पप्पूच्या छातीवर वार केला. छातीतून रक्ताच्या धारा वाहू लागल्याने पुन्हा या भागात दिसायचे नाही, अशी धमकी देत नशेखोराने तेथून पळ काढला.
पप्पूला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या छातीवर डॉक्टरांनी १५ टाके दिले आहेत. तरीही पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करताना अनोळखी आरोपीवर केवळ शस्त्राने मारहाण केल्याचे कलम लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.