

Drought strikes; Fodder and water problem is serious in Babra area
बाबरा, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील बाबरा आणि परिसरातील गावांमध्ये दुष्काळाचे तीव्र परिणाम जाणवू लागले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसताना जनावरांच्या संगोपनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने दूधउत्पादक शेतकरी आणि पशुपालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतांमध्ये हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरे जगवण्यासाठी पशुपालकांना विकतचा चारा घेण्याची वेळ आली आहे. आधीच शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने चारा खरेदीचा अतिरिक्त भार सहन करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे.
बाबरा परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गायी-म्हशींच्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, चारा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. चाऱ्याअभावी दूध उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही परिणाम प होण्याची शक्यता आहे.
दुष्काळामुळे शेतीची कामे मंदावली असून शेतमजुरांनाही नियमित रोजगार मिळणे कठीण झाले आहे. पिकांचे नुकसान आणि उत्पन्नातील घट यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नसताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही जिकिरीची ठरत आहे. आगामी काळात पावसाची परिस्थिती सुधारली नाही, तर पशुपालकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
बाबरा आणि परिसरातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी आणिपशुपालकांकडून होत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी आणि दूध उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज.