

Drainage water flows directly into the park's drain
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ड्रेनेजचे पाणी सोडण्यास मनाई असतानाही सिडको एन-८ येथील महानगरपालिकेच्या बॉटनीकल उद्यानातील मुख्य नाल्यात थेट मलमिश्रित पाणी सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, शहरातील विविध नाल्यांची पाहणी करून कठोर कारवाईचे आदेश देणारे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शनिवारी (दि. २३) संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असतानाही उद्यान विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील मलनिःसारण व्यवस्था सुध-ारण्यासाठी काही वर्षांपूर्वी भूमिगत गटार योजना राबविण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शहरातील सांडपाणी व मलनिस्सारण वाहिन्या एकत्र करून एसटीपी प्लांटवर शुद्धीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच नाल्यांमध्ये थेट दूषित पाणी सोडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरण्यासह पर्यावरणीय हानी होत असल्याने ही योजना महत्त्वाची मानली गेली होती.
मात्र आजही अनेक भागांमध्ये नागरिकांकडून ड्रेनेज व सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचे प्रकार सुरूच आहेत. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शनिवारी कबाडीपुरा, बारुदगार नाला, संभाजीपेठ आदी भागांची पाहणी केली. यात मुख्य नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. दरम्यान, सिडको एन-८ मधील महानगरपालिकेच्या बॉटनीकल उद्यानातही असाच प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.
उद्यानातील मुख्य नाल्यात मोठ्या पाईपद्वारे थेट ड्रेनेजचे पाणी सोडले जात असून, त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे सकाळी जॉगिंग, व्यायाम आणि मनोरंजनासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे मनपा प्रशासन शहरातील नागरिकांविरोधात कारवाईचे संकेत देत आहे. तर दुसरीकडे स्वतः महापालिकेच्या उद्यानातच अशा प्रकारे दूषित पाणी सोडले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आयुक्तांची पाहणी, कारवाईचे आदेश
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शनिवारी शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली. कबाडीपुरा, बारुदगार नाला आणि संभाजीपेठ परिसरात मुख्य नाल्यात दूषित पाणी मिसळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले असून नाल्यांमध्ये सांडपाणी सोडणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत
मॉर्निंग वॉकर्स त्रस्त सिडको एन-८ येथील बॉटनीकल गार्डनमध्ये सकाळी मोठ्या संख्येने नागरिक जॉगिंग, योगा आणि व्यायामासाठी येतात. मात्र, मुख्य नाल्यात सोडण्यात येणाऱ्या ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे