

Drainage mixed water in the taps in Usmanpura
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील उस्मानपुरा भागात नळांना ड्रेनेजमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यासंदर्भात ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यांच्या या तक्रारीकडे मनपा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र असून पाणीपुरवठा होऊन तीन दिवस उलटले तरी नळांना ड्रेनेजमिश्रित पाणी येत आहे.
गेल्या चार दिवसांपासून उस्मानपुरा भागात ड्रेनेज तुंबले असून चेंबरमधून घाणपाणी वाहत आहे. हे ड्रेनेजचे घाणपाणी थेट पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून वाहत असल्याने नळांना ड्रेनेजमिश्रित पाणी येत आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वी या भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. या पाणीपुरवठ्यात ड्रेनेजमिश्रित पाणी मिसळल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती.
त्यामुळे अनेक नागरिकांनी पाणी न भरताच तसेच सोडून दिले. त्यानंतर ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी तत्काळ यांची तक्रार मनपा झोन कार्यालयाचे सहायक आयुक्त, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि ड्रेनेज विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली.
मात्र सुट्टीवर असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. दुषित पाणी बाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्याची माहिती येथील नागरिक देतात. परंतु तक्रारी करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे मनपा प्रशासनाने गांभियनि लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
या भागाचा पाणी पुरवठा बंद झाल्यानंतरही तीन दिवसापासून नळांना ड्रेनेजमिश्रित पाणी येत आहे. या दुर्गंधी पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. फुटलेल्या ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती कराव अशी मागणी नितीन पवार यांनी केली आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास उस्मानपूरा परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करणार.