

छत्रपती संभाजीनगर: शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही, असे महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी मंगळवारी (दि.८) आंबेडकरनगर येथे स्पष्ट केले. आंबेडकरनगरात पाडापाडीच्या कारवाईसाठी मनपाचे पथक धडकताच नागरिकांनी तीव्र विरोध करीत दोन तास कारवाई रोखून धरली. त्यामुळे मनपा प्रशासक जी श्रीकांत आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार हे घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत पाडापाडीत बाधित मालमत्ताधारकांचे पुनर्वसन तातडीने केले जाईल, बौद्ध विहार आणि कमानीचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाडापाडीला पुन्हा सुरुवात झाली.
महापालिकेने हर्सल टी पॉइंट ते सिडको बसस्थानकापर्यंत ६० मीटर रस्त्यासाठी आज मंगळवारी भर पावसात मनपाचे पथक आंबेडकर चौकात दाखल झाले. यावेळी रस्त्याच्या मध्यभागातून ३० मीटर मोजणी करून इमारतीवर मार्किंग केली. मात्र, या भागातील नागरिकांनी पाडापाडीच्या कारवाईला विरोध करत रस्त्याला बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांचे पुनर्वसन करावे, या ठिकाणी असलेली कमान आणि बौद्धविहारचे तातडीने बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत कारवाई सुरू करू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला.
यावेळी अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी तत्काळ मनपा प्रशासक आणि पोलिस आयुक्तांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यावरून मनपा प्रशासक जी श्रीकांत आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार हे आंबेडकरनगरात दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मनपा प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की, शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. रस्त्याच्या जागेत मनपाची परवानगी न घेता, गुंठेवारी न करता बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहे.
पाडापाडीची मोहीम आता सुरूच राहणार असून ती थांबणार नसल्याचे जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले. तसेच आंबेडकरनगरातील नागरिकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. बाधितांचे पुनर्वसन करून कमान आणि बौद्धविहार बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी ६७ (३) (सी) चा वापर केला जाणार असल्याचेही श्रीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान दोन तासांपासून थांबलेली पाडापाडीच्या कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली.
आंबेडकर चौकात पाडपाडीसाठी पथक दाखल होताच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान मनपा प्रशासक आणि पोलिस आयुक्त घटनास्थळी दाखल होताच तणावाचे वातारण निर्माण झाले. गर्दी झाल्याने वाहतूक देखील ठप्प झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक झाली.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहरात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटवली जात आहे. या मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. नागरिकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, नसता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पवार म्हणाले.