

Degree examinations begin today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षा मंगळवार (दि.७) पासून सुरू होत आहे. चार जिल्ह्यांतील २४० केंद्रांवर दोन लाख ८२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा, गतिमान निकाल यासंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती माहिती परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाची कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.६) बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आजपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर व इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बहिःस्थ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली.
परीक्षा आयोजन व निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या प्रत्येक जिल्ह्याकरिता एक प्राचार्य यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती आली. यंदाच्या परीक्षा पारदर्शक तसेच निकालही वेळेत लावण्यात येतील, असे यावेळी संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी घोषित केले.