Deepfake video : अर्थमंत्र्यांच्या डीपफेक व्हिडिओची भुरळ; कंपनी अधिकाऱ्याला १७ लाखांचा गंडा

फॉरेक्स ट्रेडिंगसाठी घरचे दागिने विकून भरले पैसे; व्हर्चुअल नफा दाखवून खाती रिकामी
Deepfake video
Deepfake video : अर्थमंत्र्यांच्या डीपफेक व्हिडिओची भुरळ; कंपनी अधिकाऱ्याला १७ लाखांचा गंडाfile photo
Published on: 
Updated on: 

Deepfake video of Finance Minister proves deceptive; company executive loses 17 lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा व्हिडिओ पाहून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणे एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. परदेशी चलनाच्या व्यापारात (फॉरेक्स ट्रेडिंग) भरघोस नफ्याचे आमिष दाखवून, ३२ हजार डॉलर्सचा खोटा आभासी (व्हर्चुअल) नफा दाखवत सायबर भामट्यांनी या अधिकाऱ्याची तब्बल १७ लाख ३४ हजार ७१६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

Deepfake video
Fraud Case : १२ वी नापास सराईत गुन्हेगाराचा 'तोतया पोलिस' बनून रुबाब

नफ्याच्या हव्यासापोटी घरातील सोन्याचे दागिने विकून पैसे भरणाऱ्या या अधिकाऱ्याला अखेर सर्व रक्कम गमावण्याची वेळ आली. याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहम्मद रिजवान मोहम्मद हरुण शेख (४०, रा. मलिक अंबर कॉलनी, जटवाडा रोड, हसूल) यांच्या तक्रारीनुसार, ते शेंद्रा एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत प्रॉडक्शन ऑफिसर म्हणून नोकरीला आहेत. २८ जून २०२६ रोजी सुट्टीच्या दिवशी रिजवान हे घरात असताना आपले फेसबुक अकाउंट पाहत होते. त्यावेळी त्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एक व्हिडिओ क्लिप दिसली.

त्या व्हिडिओमध्ये गरीब लोकांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा व्हिडिओ खरा वाटल्याने त्यांनी व्हिडिओखाली दिलेली सेवेक्सा नावाची वेबसाईड लिंक उघडून त्यावर स्वतःची माहिती भरून रजिस्ट्रेशन केले. ३ जुलै रोजी रिजवान यांच्या मोबाईलवर ४४ या युनायटेड किंगडमच्या कोडवरून किनजा सय्यद नावाच्या तरुणीचा फोन आला.

Deepfake video
Sambhajinagar News : १३ थकबाकीदारांची मनपाकडून मालमत्ता सील

तिने सेवेक्सा कंपनीची प्रमोटर असल्याचे सांगत फॉरेक्स ट्रेडिंग सुरू करण्यासाठी किमान २०० डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल असे सांगितले. रिजवान यांनी क्रेडिट कार्डवरून २२ हजार ४८८ रुपये भरले. दुसऱ्याच दिवशी मोहम्मद यासीन वोहरा नावाच्या व्यक्तीने फोन करून स्वतःला अकाउंट मॅनेजर असल्याचे सांगितले आणि २०० डॉलर्स खूप कमी आहेत, मोठी रक्कम लावा आणि मोठा नफा कमवा असे सांगून भुरळ घातली. त्यानंतर रिजवान यांनी वेळोवेळी डेबिट कार्डवरून ५७ हजार व ५२ हजार रुपये भरले. त्यावेळी त्यांच्या आभासी पोर्टफोलिओवर १ हजार ३०० डॉलर्स नफा जमा झाल्याचे दाखवण्यात आले.

दागिने विकून भरले पैसे; देशभरातील खात्यांवर लाटली रक्कम

अकाउंट मॅनेजर वोहरा याने नफा वाढल्याचे दाखवत टेलिग्रामवरून वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती पाठवून अजून पैसे टाकण्यास भाग पाडले. १४ जुलै : नवी दिल्लीतील पहाडगंज येथील येस बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे तब्बल ७ लाख रुपये पाठवले. २२ ऑगस्ट : वोहराच्या सांगण्यावरून रिजवान यांनी घरातील सोन्याचे दागिने विकून चेन्नईतील एका खात्यावर २ लाख ५५ हजार रुपये जमा केले. १ सप्टेंबर पुन्हा घरचे सोने विकून येस बँकेच्या खात्यावर ३ लाख ७१ हजार रुपये पाठवले. ९ सप्टेंबर : पश्चिम बंगालमधील एका बँकेत ३ लाख रुपये भरले.

पोर्टफोलिओतून डाटाच गायब

रिजवान यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १७ लाख ३४ हजार ७१६ रुपये भामट्यांच्या खात्यावर वर्ग केले. त्यांच्या बनावट ऑनलाईन पोर्टफोलिओवर तब्बल ३२ हजार डॉलर्स (अंदाजे २६ लाख रुपयांहून अधिक) इतका नफा दिसत होता. १७ सप्टेंबर रोजी आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी केली, मात्र त्या दिवशी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बँक बंद असल्याने पैसे भरता आले नाहीत. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी रिजवान यांनी लिंक उघडून आपला पोर्टफोलिओ तपासला असता, त्यातील सर्व माहिती आणि जमा झालेली रक्कम गायब झाल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हसूल पोलिसांत धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वाती केदार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news