छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणींची चिंता मिटली आहे. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबरअखेरीस तिसरा हप्ता जमा होणार आहे. याबाबत शासनाची तयारी पूर्ण झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत ही रक्कम खात्यात पडणार आहे. तसेच ज्यांना अद्याप जुलै, ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत त्या पात्र महिलांच्या खात्यात एकरकमी तीन महिन्यांचे पैसे पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आलेली आहे. २८ जून महिन्यात याचा शासनादेश जारी झाला तर त्यानंतर सुधारित शासनादेशही आला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जुलैपासून पात्र महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात एकरकमी दोन महिन्यांचे पैसे खात्यात जमा झाले. योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता १४ ऑगस्टला देण्यात आलेला आहे. दरम्यान २२ तारीख उजाडूनही सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात पडले नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत हे पैसे खात्यात वर्ग होतील. अशी माहिती कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे.