कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क - लाडकी बहिण योजनेचे विरोधकांना पोटशूळ आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले, सर्वसामान्य महिलांसाठी ही योजना आणल्यानंतर अनेकांना डोकेदुखी झाली, पोटदुखी झाली, पाठदुखी झाली...सर्व आजारा झाले. ही योजना केवळ जुमला आहे, या योजनेतून पैसे मिळणार नाहीत, असे वारंवार विरोधक सांगू लागले. इतकचं नाही तर ही योजना बंद व्हावी म्हणून विरोधक कोर्टात गेले. तुम्ही दिलं नाही, आम्ही देतोय, ते थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत गुरुवारी दि. २२ रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सन्मान सोहळा पार पडत आहे. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. तत्पुर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले.
ही योजना इतकी लोकप्रिय झाली की, गावागावांत शहरात पोहोचली. १ कोटी ५० लाख भगिनींनी अर्ज भरले. ही योजना फसवी असल्याचे विरोधक म्हणू लागले. बहिणींना, पोरा बाळांचा घास हिरावून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे, असा प्रश्नही शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.