

उंडणगाव : उंडणगाव-गोळेगाव रस्त्यावरील नागेश्वरवाडी जवळील शेतवस्तीवर भरदिवसा धाडसी दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी घडली. या घटनेमुळे उंडणगाव परिसरात खळबळ उडाली असून, शेतवस्तीवरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास सणांसे यांच्या घरावर दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कोठीमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील सोन्याचे दागिने व रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी सोनसाखळी, अंगठ्या, कानातील दागिने, गळ्यातील साखळी तसेच लहान मुलांचे दागिने असा अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवजासह दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. शेती कामाचे दिवस असल्याने कैलास सणांसे यांचे कुटुंबीय शेतात कामासाठी गेले होते.
कैलास सणांसे यांची दोन ठिकाणी शेती असून, एक शेती उंडणगाव-गोळेगाव रस्त्यावर तर दुसरी गावाच्या उत्तरेस नदीच्या पलीकडे वसई रस्त्यावर आहे. त्यामुळे घरातील सर्वजण शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भरदुपारी हा दरोडा टाकला.
कैलास सणांसे यांचा मुलगा राहुल हा नौदलामध्ये कार्यरत असून, तो मंगळवारी सकाळीच सुटीवर गावाकडे आला होता. त्याने आपल्याकडील काही रोख रक्कम वडिलांकडे ठेवण्यासाठी दिली होती. ही रक्कमही चोरट्यांनी लंपास केली असल्याचे कैलास सणांसे यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी बीट जमादार सांडू जाधव, हेड कॉन्स्टेबल सोनवणे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अजिंठा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केले. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घरातील चोरट्यांचे हाताचे ठसे व इतर पुरावे गोळा करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू ठेवले. भरदिवसा शेतवस्तीवर झालेल्या या दरोड्यामुळे उंडणगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.