Dombivli Crime : डोंबिवलीत पावसात घरफोड्या! ५ सशस्त्र चोरट्यांची टोळी CCTV मध्ये कैद; २ सोसायट्यांमध्ये लाखोंची लूट

Dombivli Crime : डोंबिवलीत पावसात घरफोड्या! ५ सशस्त्र चोरट्यांची टोळी CCTV मध्ये कैद; २ सोसायट्यांमध्ये लाखोंची लूट
Published on
Updated on

डोंबिवली : एकीकडे रिमझिमणाऱ्या पावसाच्या आवाजात घरांच्या तोडफोडीचा आवाज विरून जाईल, याची घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना खात्री असते. हीच संधी साधून रविवारच्या पहाटे डोंबिवली एमआयडीसीचा निवासी विभाग गाढ झोपेत असतानाच, ५ चोरट्यांच्या टोळीने आपला कार्यभाग साधला. चेहऱ्यावर फडके बांधून आलेल्या या टोळीने सर्व्हिस रोडवरील दोन वेगवेगळ्या सोसायट्यांमधील बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. हातात धारदार हत्यारे असलेल्या या टोळीच्या शिरकावामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, त्या आधारे मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही टोळी एमआयडीसी निवासी विभागातील सर्व्हिस रोडवर आली. त्यांनी प्रथम सिमेन्स सोसायटी (आरएच ८२) आणि त्यानंतर बाजूच्या गुरुराज सोसायटी (आरएच ८३) ला आपले लक्ष्य (टार्गेट) केले. या सोसायट्यांमधील काही रहिवासी सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेल्याने त्यांचे बंद असलेले फ्लॅट शोधून चोरट्यांनी ते फोडले. चेहऱ्यावर कपडा आणि हातात धारदार हत्यारे घेऊन आलेल्या या सशस्त्र टोळक्याच्या हालचाली सोसायटीच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत.

नेमका किती ऐवज गेला? अद्याप अस्पष्ट

ज्या फ्लॅटमध्ये घरफोड्या झाल्या आहेत, तेथील रहिवासी सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरातून नेमका किती आणि काय ऐवज चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित फ्लॅटमालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, जेणेकरून चोरीच्या मालाचा अचूक आकडा समोर येईल.

भयभीत रहिवाशांचा पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार

गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी घटनेनंतर रहिवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. "पोलिसांची गस्त कुठे आहे? आम्ही आमच्याच घरात सुरक्षित आहोत का?" असे संतप्त सवाल परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या ५ जणांच्या टोळीचा कसून शोध घेत आहेत.

रहिवाशांची मागणी आणि पोलिसांची भूमिका

पावसाळ्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी एमआयडीसीच्या निवासी विभागातील नागरिकांनी केली आहे. यावर मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज कसून तपासले जात आहेत. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनेतील आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल आणि परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त अधिक वाढवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news