

Sambhajinagar D Pharmacy student ends life by hanging
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
डी फार्मसीच्या विद्यार्थिनीने खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास सिडको एन-७ भागातील ग्रिव्हिल कॉलनीत उघडकीस आला. कल्याणी परेश्वर वायाळ (२१, रा. सावरगाव वायाळ, पिंपरखेड, ता. मंठा. जि. जालना) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, कल्याणी ही श्री साई इन्स्ट्युटमध्ये डी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. एक ते दीड वर्षापूर्वी ती अन्य तीन मैत्रिणींसह एन ७ भागातील ग्रीव्हिल्स कॉलनीमध्ये प्रताप डकवा यांच्या घरात भाड्याने राहत होती. नेहमीप्रमाणे कल्याणीच्या मैत्रीणी सकाळी दहाच्या सुमारास कॉलेजला गेल्या. तेव्हा कल्याणी रूमवरच होती. प्रॅक्टिकल संपल्याने तिघी मैत्रिणी कॉलेजहून दुपारी साडेबाराच्या सुमारास परत आल्या.
तेव्हा कल्याणी दरवाजा उघडत नव्हती. खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना कल्याणीने सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ घरमालक व शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. परिसरातील नागरिकांनी सिडको पोलिसांना कळविले. कल्याणीला बेशुद्धावस्थेत तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले. कल्याणी ही आठ-पंधरा दिवसांपूर्वीच गावाकडून कुटुंबीयांना भेटून आली होती. तिचे वडील शेतकरी असून, तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. कल्याणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेची सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कल्याणी व तिच्या वर्गमैत्रीणी एक ते दीड वर्षापासून एन-७ भागात राहतात. तिघीजणी नियमित कॉलेज करतात. तर कल्याणी चिश्तिया चौकातील एका मेडिकल दुकानामध्ये मागील दोन महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होती. चौघी मैत्रिणी रूमवरच स्वयंपाक करत असल्याने तिने सकाळी भाजी बनवली. दुसरीने पोळ्या बनविल्या. त्यानंतर तिघीही डब्बा घेऊन कॉलेजला गेल्या. तेव्हा कल्याणी मेडिकलवर न जाता खोलीवरच थांबली आणि तिने गळफास घेतला.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीने गळफास घेतला तेव्हा तिचा मोबाईल काही अंतरावर कॅमेरा तिच्या दिशेने करून उभा ठेवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. तिने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ शूट केला की कॉल केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला. पॅटर्न लॉक असल्याने मोबाईल फॉरेन्सिककडे पाठविण्यात आला आहे.