

Cyber security, make effective use of National Intelligence Grid: IG Virendra Mishra
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित व प्रामाणिक कारवाई करणे हा पोलिस दलाचा मुख्य उद्देश आहे, असे स्पष्ट निर्देश विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी दिले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत सायबर सुरक्षा, ई-बिट व नेटग्रिड (नेशनल इंटेलिजेंस ग्रिड) प्रणालीचा प्रभावी वापर आणि सणोत्सव बंदोबस्तावर विशेष भर देण्याचे आदेश दिले.
या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्न-पूर्णा सिंह यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा अधिकारी व जिल्ह्यातील २४ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आयजी मिश्र यांनी सांगितले की, ई-बिट प्रणाली प्रभावीपणे राबवून प्रत्येक पोलिस ठाण्याचे ई-बिट क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
नेटग्रिड प्रणालीचा योग्य वापर करून तपास कार्यवाही करावी. १००% गावभेटी पूर्ण करून गोपनीय बातमीदार तयार करणे, न तामिल वॉरंट तातडीने तामील करणे यावर भर द्यावा. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल सुरक्षा जनजागृती मोहिमा राबविणे, शाळा महाविद्यालयांमध्ये नव्या सायबर कायद्यांबाबत माहिती देणे, तसेच नव्याने लागू झालेल्या फौजदारी कायद्यांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दारूबंदी, जुगार, आर्म्स अॅक्ट, एनडीपीएस, वाळू चोरी आणि पिटा यांसारख्या प्रकरणांवर कठोर कारवाई करणे, आरोपींना तातडीने अटक करून न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे तसेच चोरी गेलेल्या मुद्देमालाची लवकर परतफेड करणे यावरही त्यांनी विशेष भर दिला.
सणोत्सव काळात मंडळांची अद्ययावत माहिती ठेवणे, मिरवणूक मार्ग व विसर्जनस्थळांची पाहणी करणे, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवणे आणि पूरजन्य परिस्थितीसाठी एनडीआरएफसोबत समन्वय साधून सराव घेण्याचेही निर्देश देण्यात आले.