

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सीएसएमआरडीए) अंतर्गत येणाऱ्या गावांसह झालर क्षेत्रातील नियोजनबद्ध विकासाला गती देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त तथा 'सीएसएमआरडीए'चे आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (दि. १६) कंत्राटी पदभरतीला मंजुरी दिली असून, पुढील आठवड्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सहआयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपआयुक्त (प्रशासन) लखीचंद चव्हाण आदी उपस्थित होते.
प्राधिकरण क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प लक्षात घेता सक्षम मनुष्यबळाची गरज असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या धर्तीवर ही कंत्राटी भरती केली जाणार असून, यामध्ये विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सहायक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
१४७ नियमित पदांचाही आढावा
या बैठकीत प्राधिकरणातील नियमित पदभरतीचाही आढावा घेण्यात आला. वर्ग-१ ते वर्ग-४ श्रेणीतील १४७ नियमित पदांसाठी सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली असून, शासनाच्या नियमानुसार ही भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सहआयुक्त अंजली धानोरकर यांनी माहिती दिली.
यासह बैठकीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्ती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवडीचे निकष आणि बाह्यस्त्रोतांद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा झाली. या भरतीमुळे झालर क्षेत्रातील विकासकामांना मोठी गती मिळून नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देणे शक्य होणार आहे.