Crime News : चोलामंडलम फायनान्सच्या मॅनेजरला मारहाण; दीड लाखाची मागितली खंडणी

गाडी जप्त केल्यावरून कार्यालयात घुसून राडा; अपहरणाची दिली धमकी
Crime News
Crime News : चोलामंडलम फायनान्सच्या मॅनेजरला मारहाण; दीड लाखाची मागितली खंडणीfile photo
Published on
Updated on

Crime News : Manager of Cholamandalam Finance beaten up; Demanded ransom of one and a half lakh

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्जाचे हप्ते न भरल्याने जप्त केलेली गाडी दंड भरून सोडवून नेल्यानंतरही, गुंडांनी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घुसून राडा केला. अमोल बर्डेची गाडी जमा करण्याची तुमची हिंमत कशी झाली, मनस्तापापोटी दीड लाख रुपये भरपाई दे, अशी मागणी करत गुंडांनी रिजनल मॅनेजरला बेदम मारहाण केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेत थेट अपहरणाची धमकी दिली.

Crime News
Excessive Rainfall : मराठवाड्यात केवळ ५ मंडळांत अतिवृष्टी

ही घटना सोमवारी (दि.२७) दुपारी एमआयटी ब्रिजजवळील चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घडली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णा बोरगे आणि त्याचे दोन साथीदार अशी आरोपींची नावे असून, तिघेही फरार आहेत.

फिर्यादी दिगंबर पाईकडे (४९) यांच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये अमोल देविदास बर्डे (रा. पाचोड, ता. पैठण) याने त्यांच्या कंपनीतून कर्ज घेऊन एक चारचाकी गाडी (एमएच-२०-जीसी-५९८५) खरेदी केली होती. मात्र त्याने हप्ते न भरल्याने थकबाकी दोन लाख रुपयांवर गेली होती. नोटीस देऊनही दाद न दिल्याने कंपनीने ४ जुलै रोजी कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही गाडी यावल, ता. दौंड येथे जप्त करून गोदामात लावली होती. त्यानंतर अमोल बर्डे, अण्णा बोरगे दोन साथीदारांसह ८ जुलै रोजी कार्यालयात आले.

Crime News
Sambhajinagar News : एसओपीचे उल्लंघन करून १२०० तुकड्यांची रजिस्ट्री

त्यांनी धमकावून गाडी परत देण्याची मागणी करत शिवीगाळ केली. गाडी त्यांच्या सांगण्याप्रमाणे दिली नाही तर परिणाम भोगण्याची धमकी देऊन गोंधळ घातला होता. त्यावेळी शाखेतील सतीश भिंगारे, हरीश चौधरी यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर थकबाकी भरण्याची हमी देऊन निघून गेले होते. दरम्यान, १३ जुलै रोजी अमोल बर्डे, अण्णा बोरगे आणि त्यांच्या साथीदारांनी कार्यालयात येऊन ९० हजार रुपये भरले आणि ती गाडी सोडवून नेली होती.

सोमवारी (दि. २७) दुपारी १ वाजेच्या सुमारास अण्णा बोरगे आणि त्याचे दोन साथीदार पुन्हा कार्यालयात घुसले. अमोल बर्डे आमचा माणूस असल्याचे तुम्हाला माहीत नव्हते का? त्याची गाडी जमा करण्याची तुमची हिंमतच कशी झाली ? असे म्हणत त्यांनी पाईकडे यांना शिवीगाळ सुरू केली. आम्हाला खूप मनस्ताप झाला असून, आता दीड लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल, अशी धमकी आरोपींनी दिली. पाईकडे यांनी पैसे देण्यास नकार देत कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास सांगताच, आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली.

मोबाईल हिसकावला

बोरगेने लॅपटॉपची बॅग हिसकावली, मात्र पाईकडे यांनी विरोध करत ती परत मिळवली. या झटापटीदरम्यान पाईकडे यांनी पोलिसांच्या मदतीसाठी ११२ डायल करण्यासाठी स्वतःचा मोबाईल काढला असता, आरोपींनी तो हिसकावून घेतला आणि तुला उचलून नेतो, अशी धमकी दिली. कार्यालयातील इतर कर्मचारी मदतीला धावून येत असल्याचे पाहून आरोपींनी तेथून पोबारा केला.

शस्त्र असण्याची शक्यता

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अण्णा बोरगे आणि त्याचे साथीदार त्यांच्या शर्टच्या आत सतत हात घालत हालचाली करत असल्याचे दिसत असून, त्यांच्याकडे शरूत्र असण्याची शक्यताही फिर्यादीत वर्तवण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे करत आहेत.

आरोपीविरोधात हल्ल्याचे २ गुन्हे

आरोपी अण्णा बोरगे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी क्रांती चौक आणि छावणी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news