

Student Organizations Protest Babasaheb Ambedkar University
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कुलगुरू व कुलसचिव यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी बुधवारी (दि.९) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी सुसाईड नोट मध्ये ज्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी संघटनेने केली. दरम्यान विविध मागण्यासाठी कुलगुरूंना निवेदन देण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, पोलिसांनी निवेदन देण्यासाठी विरोध करून सहा जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थी संघटनांना डफड वाजवून निषेध करत होते. याला पोलिसांनी विरोध केला.त्यामुळे विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप करत पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनीही त्या नेत्यांना जबरदस्ती गाडीत कोंबून सहा जणांना बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवारी घटलेल्या घटनेनंतर वातावरण तापणार असल्याचा अंदाज आल्याने बेगमपुरा पोलिसांनी सकाळपासूनच विद्यापीठ परिसरात बंदोबस्त लावला होता.