

Khelna Medium Project at ninety percent, arrivals increased in Charner-Pendgaon
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केळगाव लघु, निल्लोड प्रकल्पा पाठोपाठ खेळणा मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. खेळणा प्रकल्प ९० टक्के भरला आहे. चारनेर-पेंडगावमध्ये आवक वाढल्याने पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचला आहे. तर अजिंठा अंधारी ४१ टक्के भरला आहे.
तालुक्यात गणपती उत्सवात भाग बदलत दमदार पाऊस झाला. यात केळगाव, आधारवाडी परिसरात दमदार पाऊस झाल्याने केळगाव लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तर आवक वाढल्याने खेळणा प्रकल्प ९० टक्के भरला आहे. कन्नड तालुक्यातील पूर्णा नेवपूर प्रकल्प भरल्याने आवक वाढून चारनेर - पेंडगाव निम्मा भरला आहे. तर अजिंठा अंधारीचा पाणीसाठा ४१ टक्क्यांवर पोहचला आहे. या आधी निल्लोड, केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे. पावसाळा अजून तीन आठवडे राहिला आहे.
तर आवक सुरूच असल्याने खेळणासह चारनेर पेंडगाव, अजिंठा-अंधारी प्रकल्प भरण्याच्या मार्ग मोकळा झालेला आहे. तालुक्यातील निल्लोड, केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने तर खेळणा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्याचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. पूर्णा, अंजना, खेळणा या प्रमुख नद्यांसह छोटे मोठे नदी नाले मनसोक्त वाहत आहे. तर विहिरी तुडुंब भरल्याने रबी हंगामाचा मार्गही मोकळा झाला आहे. तालुक्यात यंदा मकाचे क्षेत्र वाढलेले आहे. तर कापसाचे क्षेत्र कमी झालेले आहे. पिके अंतिम टप्प्यात असताना दमदार पाऊस झाल्याने मका, कापूस, सोयाबीन पिके जोमात आली आहे.
तालुक्यात सरासरी पाऊस
तालुक्यात यंदाही सरासरी एवढा पाऊस झाला. आतापर्यंत तालुक्यात ५८० मि. मी. पावसाची नोंद झाली. यात सिल्लोड मंडळात ४५४ मि. मी. पाऊस झाला. भराडी ५०९, अंभई ६७६, अजिंठा ६०९, गोळेगाव ७४८, आमठाणा ५९७, निल्लोड ६०५ तर बोरगाव बाजार मंडळात ५८२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गोळेगाव मंडळात झाला आहे.