

Copy-free 10th-12th exams through token method
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यातील इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी यंदा टोकन पद्धतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही पद्धत अंमलात आणण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणी अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावी यासाठी केंद्रावरील एकूण विद्यार्थ्यांनुसार अनुक्रमांकाने टोकन वाटप केले जातात. प्रत्येक टोकनसाठी स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. किमान २५ विद्यार्थ्यांची तपासणी संबंधित शिक्षकांकडून केली जाते आणि तपासणीनंतर त्या टोकनवर शिक्षकाचे नाव नोंदविले जाते.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर टोकन विद्यार्थ्यांच्या खिशात ठेवले जाते. केंद्र संचालकांकडे याची स्वतंत्र नोंद रजिस्टरमध्ये ठेवली जाते. भरारी पथकांनी अचानक भेट दिल्यास विद्यार्थ्यांकडील टोकनवरून तपासणीची खातरजमा करता येते. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सजगता वाढली असून, शिक्षकांमध्येही उत्तरदायित्वाची भावना दृढ झाली आहे.