

Controversy over Abdul Sattar's entry into the temple
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (दि.१५) दुपारी तालुक्यातील रहिमाबाद येथील प्राचीन हेमाडपंती नागेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याने वादंग निर्माण झाला. आ. सत्तार येथून जाताच गावातील काही हिंदुत्ववादी तरुणांनी मंत्र उच्चारात मंदिरात गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केले.
अब्दुल सत्तार सकाळी मांसाहार केल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मंदिरात प्रवेश करत मंदिर अपवित्र केल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले. या मंदिर प्रवेशावरून आता राजकारण सुरू झाले आहे.
आ. अब्दुल सत्तार महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना. रविवारी महाशिवरात्रीनिमित्त आ. अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील प्राचीन हेमाडपंती नागेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर यांच्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान आ. अब्दुल सत्त-ारांनी मंदिरातील महादेवाची पिंड असलेल्या गाभाऱ्यात प्रवेश केला.
आ. सत्तार गावातून जाताच हिंदुत्ववादी तरुण मंदिरात जमले. त्यांनी मंत्र उच्चारात मंदिरात गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केले. यावेळी तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या. तरुणांच्या म्हणण्यानुसार अब्दुल सत्तार सकाळी मांसाहार केल्याशिवाय घर सोडत नाहीत. त्यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मंदिरात प्रवेश करणे चुकीचे आहे. याच कारणास्तव गोमूत्र शिंपडून ते पवित्र केल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर सोमवारी (दि. १६) हा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवल्याने चांगलेच रान पेटले.
एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतानची तुलना केल्याने राज्यात वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध करत असताना दुसरीकडे आ. सत्तारांच्या मंदिर प्रवेशाने नव्या वादंगाला तोंड फुटले आहे. या वादात भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले व शिवसेनेचे (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आधी हिंदू धर्म स्वीकारावा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भोसले यांनी सवाल केला की, अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? जर नसेल तर त्यांनी बाहेरूनच दर्शन घ्यायला हवे होते. आचार्य भोसले म्हणाले की, आमच्या देवी-देवतांची मंदिरे ही काही स्मारके नाहीत. मंदिरात प्रवेश करण्याचे आणि विशेषतः गर्भगृहाचे काही धार्मिक नियम असतात. राजकीय फायद्यासाठी या धार्मिक नियमांचे उल्लंघन करू नका, असे म्हणत त्यांनी सत्तारांच्या कृतीवर टीका केली. तुम्हाला जर देवाचे दर्शन घेण्याची खूपच इच्छा असेल, तर मग आधी हिंदू धर्म स्वीकारा आणि खुशाल आमच्या देवी-देवतांचे आशीर्वाद मिळवा, असे वक्तव्य केले.
गैरहिंदूनी मंदिरात प्रवेश करणे हा देवदेवतांना अशुद्ध करण्याचा प्रयत्न आहे. हिंदू धर्माची धार्मिक मर्यादा ओलांडण्याचा हा प्रकार आहे. कुणी जर राजकीय हेतूने प्रेरित होऊन असे प्रकार करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो, असे कमलेश कटारिया, कार्यवाह, संकल्प हिंदूराष्ट्र यांनी म्हटले.