Marathwada Flood: पूरग्रस्तांना मदत करा, अन्यथा....; राजू शेट्टींचा राज्य सरकारला अल्टिमेटम
पैठण: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांना दिवाळीच्या आत तातडीने मदत मिळाली नाही, तर मंत्री, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पैठण येथे शनिवारी (दि. ४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित रस्ता रोको आंदोलनादरम्यान ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर ते शेवगाव रोडवरील सह्याद्री चौकात हे आंदोलन करण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनावर टीका
माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने लादलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे नाथसागर धरणातून गोदावरी नदीत अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे हजारो कुटुंबे पुराच्या संकटात सापडली. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन पिकासह खरडून गेली आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित लाभार्थ्यांना दिवाळी सणाच्या आत राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
मदतीत गैरव्यवहार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा
मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी मदतीच्या वाटपात होत असलेल्या कथित गैरव्यवहारावरही बोट ठेवले. पैठण शहर आणि तालुक्यातील खऱ्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना वगळून, राजकीय पुढार्यांच्या समर्थकांना मदत देण्याचा कुटिल डाव रचला जात आहे. राज्य शासनाचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
रस्ता रोको आंदोलन
आंदोलन प्रसंगी राजू शेट्टी यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार राहुल बनसोडे आणि मंडळ अधिकारी कल्पना शेळके यांना देण्यात आले. या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि जालना जिल्ह्याकडे जाणाऱ्या विविध मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव मुळे, चंद्रकांत झारगड, शिवाजी डरपळे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, पवन सिसोदे इत्यादींसह शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

