

कारवाईच्या मैदानात उतरले अधिकारी
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आता केवळ पैठणगेट परिसरातच नव्हे तर क्रांती चौक ते सिल्लेखाना मार्गावरही पाडपाडी करण्यात येणार असून, या रस्त्याचे टोटल स्टेशन सव्र्व्हे करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शुक्रवारी (दि. १४) दुपारी मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे बुधवार (दि.१९) पर्यंत या मार्गावरील अतिक्रमण हटवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, क्रांती चौक ते पैठणगेट मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. मनपाच्या नगररचना विभागाकडून शुक्रवारी पैठणगेट ते सिल्लेखाना चौक (३० मीटर प्रस्तावित रस्ता), पैठणगेट ते सब्जीमंडी (९ मीटर रस्ता) आणि पैठणगेट ते खोकडपुरा (१२ मीटर रस्ता) या तीन रस्त्यांवरील सुमारे १०० बाधित मालमत्तांवर मार्किंग करण्यात आली आहे. यातील ७० बाधित मालमत्ताधारकांना नोटीसही बजवण्यात आली आहे.
क्रांती चौक ते पैठणगेट मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांच्या समस्यांनी ग्रासला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे, यामागणीसाठी वारंवार तक्रारी करून आंदोलन करण्यात आले. मात्र महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात नव्हती. परंतु चार दिवसांपूर्वी पैठणगेट भागात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कुरेशी समाजाने वॉर्ड कार्यालयासमोर ठिय्या देत अवैध दुकानांवर कठोर कारवाईची मागणी केली. या दबावानंतर मनपाकडून दोन दुकानांना नोटीस देण्यात आल्या. मात्र प्रशासक जी. श्रीकांत यांनी अर्धवट नव्हे, तर क्रांती चौक ते पैठणगेट मार्गाचे टोटल स्टेशन सर्व्हे करून तात्काळ कारवाई करा, असे स्पष्ट आदेश दिले.
दरम्यान महापालिकेकडून पैठणगेट भागातील सिल्लेखाना, सब्जीमंडी आणि खोकडपुरा या तीन मुख्य रस्त्यांवरील शंभराहून अधिक अतिक्रमणग्रस्त मालमत्तांवर शुक्रवारी मार्किंग करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत पाडापाडीची मोहीम सुरू होईल, असे स्पष्ट संकेत महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. दरम्यान पैठणगेट समोरील मोबाईल विक्रीची दुकाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. एवढेच नव्हे तर मालमत्ता विभागाच्या रेकॉर्डनुसार मनपाची जागेवरच दुकाने थाटली असून, भव्य इमारतही उभारली असल्याचे निदर्शनास आले. या इमारतीवरही मार्किंग करण्यात आली असून, शनिवारी क्रांती चौक ते सिल्लेखाना मार्गावर टोटल स्टेशन सर्व्हे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून या मार्गावर पाडापाडी केली जाणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कारवाईच्या मैदानात उतरले अधिकारी
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सक्त आदेशानंतर मार्किंगसाठी पैठणगेट भागात मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. यात झोन २ चे सहायक आयुक्त रमेश मोरे, नगररचनाकार राहुल मालखेडे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.
या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे
आयुक्तांनी दिलेल्या संपूर्ण कारवाईच्या आदेशामुळे क्रांती चौकापासून टाटोल स्टेशन सर्व्हे करून मार्किंग करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारपासून अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू होणार आहे. या मार्गाचे रुंदीकरण करणे गरजेचे असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल, गर्दी कमी होईल आणि क्रांती चौक ते पैठणगेट मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.