

For the first time, a female mayor will be elected from the people of Gevrai!
गजानन चौकटे
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, यंदा नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून या वेळी नगराध्यक्षा थेट जनतेतून निवडल्या जाणार आहेत. त्यामुळे शहरातील महिलांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि आनंदाची लहर उसळली आहे.
पूर्वी नगराध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत होती. मात्र आता थेट मतदान प्रक्रियेद्वारे महिला नगराध्यक्षा निवडल्या जाणार आहेत. या बदलामुळे नागरिकांना थेट नेतृत्व निवडण्याची संधी मिळाली असून महिलांना राजकारणात सक्रिय सहभागाचा मार्ग खुला झाला आहे. माधुरी बारटक्के यांनी सांगितले, महिलांना नेतृत्वाची ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांचा दृष्टिकोन संवेद नशील, नियोजनशील आणि व्यवहार्य असतो.
त्यामुळे नागरिकांच्या गरजा ओळखून विकास आराखडे तयार होण्यास मदत होईल. सुरेखा सुलाखे म्हणाल्या, आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. नगराध्यक्ष पदावर महिला आल्यास शहराच्या प्रशासनात नव्या कल्पना, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता येईल. दक्षा वानखेडे यांचे मत आहे की, ही वेळ महिलांनी केवळ सहभागी होण्याची नाही, तर नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची आहे.
जनतेतून थेट निवडून येणाऱ्या महिला नगराध्यक्षा शहरासाठी प्रेरणादायी ठरतील. शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, महिला नेतृत्वामुळे स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते विकास आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या प्रश्नांवर अधिक ठोस व वास्तववादी निर्णय होतील. विविध महिला संघटनांनी या संधीचे स्वागत करत, शहराच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नगराध्यक्ष पद हे केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून शहराच्या भविष्यातील दिशादर्शनाचे स्थान आहे.
त्यामुळे या वेळेस जनतेतून निवडून येणाऱ्या महिला नगराध्यक्षा गेवराई शहराच्या विकासात नवा दृष्टिकोन, संवेदनशीलता आणि कार्यसंस्कृती आणतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
महिलांच्या सहभागामुळे राजकारणात नवा अध्याय
शहरातील शिक्षित महिला, समाजसेविका, उद्योजिका आणि कार्यकर्त्या या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. स्थानिक प्रश्न, विकास आराखडे आणि नागरिकांच्या अपेक्षांवर चर्चा सुरू असून, महिलांमध्ये निवडणुकीबाबत जागरूकता आणि बांधिलकी दिसून येत आहे.
निवडणुकीची तयारी आणि नागरिकांची अपेक्षा
सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून संभाव्य उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. आचारसंहितेचे पालन करून पक्ष आणि कार्यकर्ते प्रचाराचे आराखडे आखत आहेत. नागरिकांमध्ये शांततेत, पारदर्शक पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी भावना आहे.