

Concreting the old dilapidated bridge instead of building a new one
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ७ कोटी खर्चुन पडेगाव कचरा डेपो चौक (ग्लोरिया सोसायटी) ते साई कंपाऊंड वॉल असा काँक्रीट रस्ता तयार केला. परंतु, मंजूर तीन पुलांपैकी एकाच्या कामाला कात्री लावून नव्याने पूल तयार करण्याऐवजी जीर्ण पुलावरच काँक्रीटीकरणाचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या सूचनेवरून स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने शहराच्या विविध भागांत ३१७ कोटी रुपये खर्चुन १०६ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यात पडेगाव कचरा डेपो ते संभाजीचौक मार्गे अमीन चौक या रस्त्याचाही समावेश असून काँक्रीटीकरणामुळे हा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गुळगुळीत तर झाला.
या कामासोबतच रस्त्यावर असलेले ३ पूल नव्याने तयार करायचे होते. परंतु, कंत्राटदाराने ३ पैकी दोन पुलांचे काम केल अन् तिसरा जीर्ण झालेल्या पुलाच्या नव्याने पूल तयार करण्याऐवजी या पुलावरच काँक्रीट रस्ता तयार केला जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जीर्ण झाला असून तो नव्याने तयार करावा, असे या कामाचे अंदाजपत्रक तयार करतानाच स्पष्ट केले होते. असे असतानाही कंत्राटदार एजन्सीने कात्री लावली आहे.
तात्पुरती व्यवस्था करतोय हा पूल नव्याने तयार केला जाणार आहे. सध्याम करणे शक्य नसल्याने तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर पुलाचे काम करण्यात येईल.
-इम्रान खान, प्रकल्पप्रमुख, स्मार्टसिटी प्रकल्प
ग्लोरिया सोसायटी ते साई कंपाऊंड वॉल यादरम्यान सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करणे, तीन जुने पूल नव्याने तयार करणे, या कामांचा समावेश असून त्यासाठी ७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्मार्ट सिटी योजनेतून मंजूर केले आहे.