

Compensation for land acquired for the Wakod project district office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला थकविल्यामुळे जिल्हा न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्चीची जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एक पथक गुरुवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत मोबदला अदा करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे पथक परतले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीची जप्ती टळली.
लघु पाटबंधारे विभागाने २००६ साली वाकोद मध्यम प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पासाठी फुलचंद धनावत आणि विठ्ठल धनावत यांची जमीन संपादित करण्यात आली होती. त्यांना सुरुवातीला मोबदला अदा करण्यात आला.
त्यानंतर त्यांचा वाढीव मावेजाचा अर्ज मान्य झाला. परंतु वाढीव मावेजाची सुमारे २४ लाख रुपयांची रक्कम २०१५ सालापासून संबंधितांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एक पथक खुर्ची जप्त करण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी संबंधितांशी चर्चा करून मोबदला अदा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. तसेच ८ सप्टेंबरपर्यंत मोबदला अदा करण्याबाबत लेखी पत्रही दिले. त्यानंतर खुर्चीची जप्ती टळली.