

Cloudburst-like rain in the Jarandi area
जरंडी, पुढारी वृत्तसेवा जरंडीसह परिसरात बुधवारी (ता. २४) सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने जरंडी शिवारात दाणादाण उडाली. गावालगत असलेल्या जरंडीच्या खडकी नदीला सकाळी अकरा वाजता पूर आल्याने पुराच्या तडाख्याने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील पूल वाहून गेला.
वळण रस्ते वाहून गेले
नव्याने दुतर्फा रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील नाल्यांचे पाणी आणि वळण रस्ते पक्के न केल्याने जरंडी ते सोयगाव या रस्त्यादरम्यान वळण रस्तेही वाहून गेले आहे.
शेतात पाणीच पाणी
नुकत्याच जमिनीबाहेर आलेल्या कोवळ्या अंकुरांना पाण्याने वेढा घातला आहे त्यामुळे कोवळी पिके पाण्यात बुडाली असून, काही शेती शिवारात नुकतीच मंगळवारी लागवड झालेल्या क्षेत्रात पाणीच पाणी साचले आहे. शेती बंधारे फुटून शेती वाहून गेल्याच्या प्रकार जरंडी शिवारात झाला.
अखेर तो बरसला..!
पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तालुक्यात पावसाने हजेरी लावत नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास एक महिना उशिराने पावसाने आगमन केल्याने शेतकरी चिंतेत होते. जून महिन्याचे पहिले वीस दिवस अक्षरशः उन्हाळ्यासारखे गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली होती.
मान्सूनच्या विलंबामुळे शेतीची कामे खोळंबली होती. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली होती, तर विहिरींची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात घटली होती. वाढत्या तापमानामुळे वातावरणात प्रचंड उकाडा व दमटपणा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांसह जनावरांनाही त्याचा फटका बसत होता.
तालुक्यात अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावत वातावरणात सुखद गारवा निर्माण केला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले असून खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले असून अनेक ठिकाणी शेतमजुरांची लगबग वाढली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.