

citizens of Harmulkar agitation against the Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बाधित मालमत्ता तातडीने मालमत्ताधारकांनी काढून घ्यावा. महापालिका शुक्रवारपासून कारवाई करेल, अशी घोषणा प्रशासनाच्या वतीने सोमवारी करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या मालमत्ताधारकांनी बुधवारी (दि.१९) सायंकाळी हसूलमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उपोषण आंदोलन सुरू केले. तसेच आमची घरे महापालिका स्थापन होण्यापूर्वीपासूनची आहेत. त्यामुळे प्रशासनाने रीतसर बाजार भावाच्या ४ पट मोबदला दिल्यानंतरच भूसंपादन अथवा पाडापाडी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
शहराचे प्रमुख प्रवेशद्वार सुसज्ज करण्यासाठी महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. यात बीड बायपास, पैठण रोड, जालना रोड, जुना मुंबई हायवे या चार रस्त्यांवर मोहीम राबवून प्रवेशद्वारांचा श्वास मोकळा केला. यात तब्बल ६ हजार मालमत्ता जमीनदोस्त केल्या आहेत. जळगाव रस्ता आणि दिल्लीगेट ते हसूल टी पॉइंटपर्यंतच्या मालमत्ता महापालिकेने जमीनदोस्त केल्या. परंतु हर्मूल भागातून या मोहिमेला विरोध झाल्यानंतर महापालिकेने रीतसर प्रक्रिया करून पाडापाडीचा निर्णय घेतला.
महापालिकेने यात टोटल स्टेशन सर्व्हे करून २०० फूट रुंदीकरणाची जागा निश्चित केली. त्यानुसार मार्किंग करून बाधितांना नोटीस बाजवली. परंतु आमच्या मालमत्ता या महापालिका अस्तित्वात येण्याअगोदरपासून अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे महापालिकेने तयार केलेला रस्त्याच्या रुंदीकरणाचा आराखडा महापालिका अस्तित्वात आल्यानंतरचा आहे.
त्यामुळे प्रशासने रीतसर रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवावी. यात बाजारभावानुसार ४ पटीने मोबदला द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. याच मागणीसाठी बुधवारी सायंकाळी येथील मालमत्ताधारकांनी हसूलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यात गावातील सर्व ११० मालमत्ताधारक सहभागी झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर गावकरीही पुढे आले आहेत.
मनपाकडून पर्यायी जागा
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी हसूल येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी मंदिर, मशीद आणि कब्रस्तान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पर्यायी जागा देण्याची तयारी दर्शविली होती, परंतु कमिटीने त्यास नकार दिला असून, रोख मोबदल्याची मागणी केली आहे.