

Wards of aspirants fixed after Municipal Corporation reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे आता प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी वैयक्तिक पातळीवर आपापल्या प्रभागातील जागा फिक्स करून हिर्डिंगबाजी सुरू केली असून, जागा आरक्षित झाल्याने अनेकांनी स्वतःचे पोस्टर काढून पत्नी, मुलीच्या प्रचारावर जोर दिल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रत्येक पक्षातूनच नव्हे तर अपक्षांनीही कंबर कसली आहे. परंतु यंदा महापालिकेच्या निवडणुका या वॉर्डऐवजी प्रभाग पद्धतीने होत आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले होते. गेल्या आठवड्यातच ही आरक्षण सोडत झाली असून, त्यानंतर इच्छुकांनी आपापले प्रभाग निश्चित करून त्यातील जागांवर स्वयंघोषित उमेदवारी जाहीर करीत प्रचारही सुरू केला आहे.
जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांनी स्वतःचे पोस्टर, होर्डिंग काढून त्या जागी पत्नी, मुलींचे पोस्टर झळकावत प्रचारावर जोर दिल्याचे चित्र दिसत आहे. तर काहींनी आपल्या लगतचे प्रभाग शोधून त्यात स्वतःचे बस्तान मांडले आहे.
पोस्टरबॉईजचा ऊत
महापालिकेच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्येक वसाहतीमध्ये पोस्टरबाजीचा ऊत आला आहे. प्रत्येक इच्छुकाने प्रचाराचे पोस्टर झळकावून स्वतःची प्रसिद्धी करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर थेट प्रचारावरच भर दिला आहे.
होर्डिंगबाजीकडे मनपाचे दुर्लक्ष
शहरातील प्रत्येक वॉर्डात सध्या निवडणुकीची पूर्ण तयारी सुरू झाली आहे. यात बहुतांश इच्छुकांनी महापालिकेची परवानगी न घेताच पोस्टर, होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण करीत आहेत. त्याकडे महापालिकेचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.