

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात निर्माणाधीन व्यापारी संकुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कामगाराचा तब्बल ४२ तासांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी (दि.३१) सकाळी मृतदेह आढळला. ज्ञानेश्वर तुळशीराम विटनोर (३४, रा. साईनगर, गारखेडा परिसर) असे मृत कामगाराचे नाव आहे. हे बांधकाम विनापरवाना असल्याने या प्रकरणी मालमत्ताधारक, वास्तुविशारद, अभियंता आणि न कंत्राटदार अशा चौघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबर रोजी चिकलठाणा आठवडी बाजार परिसरात व्यापारी संकुलाचा सुमारे चार हजार चौरस फुटांचा स्लॅब कोसळला होता. या घटनेत अंकुश शांताराम कांबळे आणि अशपाक शेख हे दोघे किरकोळ जखमी झाले, तर ज्ञानेश्वर तुळशीराम विटनोर ढिगाऱ्याखाली दबले होते. या घटनेनंतर महापालिका, अनिशमन दल आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. सलग २५ तासांनंतरही कामगाराचा शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी (दि.३१) सकाळी सात वाजता एसडीआरएफच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली ज्ञानेश्वर विटनोर यांचा मृतदेह आढळला. मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, महापालिकेच्या पाचव्या झोन कार्यालयातील निरीक्षक राजेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गट क्रमांक ४०९/४१० येथील मालमत्ताधारक मोहम्मद रजा खान यांच्या जागेवर व्यापारी संकुलाचे बांधकाम कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू होते. या कामात वास्तुविशारद मोहम्मद हरीस सिद्दिकी, अभियंता मोहम्मद फैजुद्दीन आणि कंत्राटदार अशोक हरी राठोड यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी मालमत्ताधारकासह चौघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामे आणि बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्लॅब हटवून दबलेल्या मजुराचा मृतदेह शोधताना मोठी कसरत करावी लागली. मोठी यंत्रणा, कर्मचारी यासाठी कामाला लावण्यात आले होते. महापालिकेने जेसीबी, भाड्याने आणले होते. मोहिमेचा किती खर्च झाला याची जुळवा-जुळव सुरू असून, त्यानंतर भूखंड मालकाला नोटीस बजावली जाईल.
अशोक खांडेकर प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी