

बीड : सोलापूर-धुळे महामार्गावरील मांजरसुंबा घाटात कोळवाडीनजीक एकाच ठिकाणी चार वाहने एकमेकांना धडकल्याची अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. शनिवारी (दि. ३१) दिवसभरात वेगवेगळ्या वेळी झालेल्या या साखळी अपघातांमध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत बीड ग्रामीण आणि महामार्ग पोलिस यंत्रणा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होती.
सोलापूर-धुळे महामार्गावर मांजरसुंबा घाट सुरू होण्यापूर्वीच्या तीव्र चढावर कोळवाडीनजीक पवनचक्कीचे अवजड साहित्य वाहतूक करणारी एक मोठी ट्रक थांबलेली होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास या उभ्या ट्रकवर एक भरधाव कंटेनर पाठीमागून जोरात धडकला. त्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास याच दुर्घटनाग्रस्त दोन वाहनांवर एका पिकअप जीपने जोरदार धडक दिली. हा गोंधळ सुरू असतानाच काही वेळाने एक कार देखील या वाहनांना येऊन धडकली. यामुळे या मुख्य मार्गावरील एक संपूर्ण लेन बंद करण्याची वेळ महामार्ग पोलिसांवर आली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाजूला घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवले होते; ज्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. या भीषण अपघातात सुब्रमणी सेनगुंडन (वय ५०, रा. राजीव गांधी नगर, रीयल नगर, तामिळनाडू) आणि कंटेनरचा हेल्पर परवेज खान (वय २५, रा. गिरामसिया, तहसील कन्नोद, जिल्हा देवास, मध्य प्रदेश) या दोघांचा करुण अंत झाला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची कायदेशीर नोंद करण्यात आली आहे.
कोळवाडीनजीकचा 'ब्लॅकस्पॉट'
सोलापूर-धुळे महामार्गावरील मांजरसुंबा घाट परिसरात सातत्याने भीषण अपघात होत आहेत. यातही कोळवाडीजवळ होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक असून हा परिसर आता 'ब्लॅकस्पॉट' बनला आहे. या ठिकाणी तज्ज्ञ समितीकडून तातडीने पाहणी करत अपघाताच्या तांत्रिक कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. येथील तीव्र उतार कमी करता येऊ शकेल का किंवा अन्य काही सुरक्षात्मक उपाययोजना करता येतील का, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.