

Chief Minister Fadnavis warns officials, 8 days deadline to improve work speed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पहिल्या टप्प्यातील वाढीव पाणीपुरवठा दररोज नियमितपणे सुरू ठेवा. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असो की, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी असो, कोणीही काम थांबवू नये नसता कारवाई केली जाईल. आता वाद नकोय, केवळ पाणी द्या, अशा शब्दांत बुधवारी (दि. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यासोबतच मनुष्यबळासह कामांची गती वाढविण्यासाठी आठवडाभराची डेडलाईन दिली आहे.
यावेळी समाज कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार सतीश चव्हाण, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीत सहभागी झाले होते. शहरासाठी अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे.
या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता, परंतु गेल्या महिन्यात पावसामुळे नक्षत्रवाडी पंपगृहाला गळती लागून पाणीपुरवठा बंद पडला होता. त्यानंतर एमजेपी अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीमधील वाद विकोपाला गेला. या वादंगामुळे १५ दिवस संपूर्ण शहर वेठीस धरल्या गेले होते. त्यामुळे महापौर समीर राजूरकरयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना माहिती दिली तसेच बैठक घेऊन समज देण्याची मागणी केली त्यानुसार बुधवारी मुंबईत विशेष आढावा बैठक पार पडली.
यात मुख्यमंत्री फडणवीस यांना एमजेपीचे अधिकारी आणि कंत्राटदारांचा चांगलीच कानउघाडणी केली. अर्धवट काम तातडीने पूर्ण करा, शहरवासीयांना वेठीस धरू नका, असा इशारा दिला. या बैठकीन पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजें जंजाळ, सभापती अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव तथा एमजेपीचे सदस्य सचिव रंगा नायक विभागीय आयुक्त्त जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अमोल येडगे याच्यासह एमजेपीचे अधिकार उपस्थित होते.