

प्रमोद अडसुळे
छत्रपती संभाजीनगर : फर्जन बाबा यांच्या बंगल्यातून घबाड जप्त केल्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात सर्व ऐवज ठेण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून छावणी पोलिस ठाण्याच्या मुख्य दारालाच पोलिसांनी हातकडी बांधून गेट बंद केले आहे. तर मागचे गेटही बंद करण्यात आले होते. ठाण्यात नागरिकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. तक्रारदारांना बाजूला बसणाऱ्या ठाणे अंमलदारापर्यंतच जाण्याची मुभा असल्याचे चित्र मंगळवारी (दि. १३) दिसून आले. आतमध्ये केवळ ठाणेदार आणि अधिकारी-कर्मचारीच वावरताना दिसून आले.
मिटमिट्यात गुन्हे शाखेच्या पथकाने थेट फर्जनच्या बंगल्यावर छापा मारून लपवून ठेवलेली ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोकड जप्त केली होती. ही रक्कम मोजताना पोलिसांच्याही नाकीनऊ आले. तब्बल १४ तास आणि ५ मशिन्स राबवूनही मोजदाद संपत नव्हती.
ही संपूर्ण कारवाई आणि पंचनामा पूर्ण करण्यासाठी पोलिसांना तब्बल २८ तासांचा प्रदीर्घ काळ लागला. त्यानंतर रोकड जप्त करून छावणी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून चक्क छावणी पोलिस - ठाण्याच्या दारालाच आतून हातकडी लावून गेट बंद केल्याचे दिसून आले. पोलिस ठाण्यातच पोलिसांना नेमकी कशाची भीती? असा प्रश्न नागरिक विचारताना दिसून आले.
फर्जन यांच्या बंगल्यातून जप्त करण्यात आलेली साडेपाच कोटींची रोकड जमा करून घेण्यासाठी छावणी पोलिसांनी एसबीआय बँकेला सोमवारी पत्र दिले. बँकेने शहागंज येथील शाखेत मंगळवारी (दि.१४) रोकड जमा करावी, असे कळविल्याचे तपास अधिकारी एपीआय विवेक जाधव यांनी सांगितले.