

छत्रपती संभाजीनगर : सेवा जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १२४४ गावांसाठी एकूण ११६४ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. त्यापैकी ७०२ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आतापर्यंत या योजनांवर एकूण ३२३ कोटी ५० लाख रुपये खर्च झाले. उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी आणखी ४२० कोटी ३१ लाख रुपयांचा निधी लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.१) जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक पार पडली. यावेळी जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. काही ठिकाणच्या कामांसाठी वस्तू व सेवांच्या वाढलेल्या दरांमुळे तसेच तांत्रिक बदलांमुळे सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ८६० योजनांमध्ये विविध कारणांमुळे सुधारणा प्रस्तावित आहेत.
गंगापूर, पैठण व वैजापूर या तालुक्यांतच बऱ्यापैकी कामे झाली आहेत. उर्वरित तालूक्यात कामांना खो बसल्याची स्थिती आहे. योजनेचे काम हे ७५ ते ९९ टक्के इतके झाले आहे. अशा ठिकाणी प्राधान्याने काम पूर्ण करावे. शाळा, अंगणवाडी, ग्रामीण रुग्णालये येथे नळ जोडणी प्राधान्याने पूर्ण करावी. जेथे कामांना अकारण विलंब होत असेल तेथे कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावा.
कामे पूर्ण झाली असूनही योजना हस्तांतरीत करण्यात अडचणी असतील तेथे विशेष ग्रामसभांचे आयोजन करुन योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ अंकीत, कार्यकारी अभियंता शामकांत वारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदिंची उपस्थिती होती.
१० एप्रिल रोजी पुन्हा आढावा घेणार
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावी, ज्या योजना पूर्ण झाल्या असूनही योजना हस्तांतरीत करण्यात अडचणी असतील तेथे विशेष ग्रामसभांचे आयोजन करुन योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला केल्या. या संदर्भात येत्या १० एप्रिल रोजी पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.