

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा, केंब्रिज बायपास परिसरात गोवंश मांस पकडून दिल्याच्या कारणावरून गोरक्षा प्रमुख गणेश अप्पासाहेब शेळके यांच्यावर कुरेशी बंगल्याच्या गल्लीत सुमारे २५ जणांच्या टोळक्याने चाकू, कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शेळके यांच्या डोक्यावर व पाठीवर गंभीर वार झाले असून, त्यांना २२ टाके पडले आहेत. मध्यस्थी करणारे मनपाचे स्वच्छता निरीक्षक सचिन शिंदे यांनाही मारहाण झाली. त्यामुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. इसा कुरेशी, फेरोज कुरेशी, उजेफ कुरेशी व एक विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, गणेश शेळके हे गोरक्षम म्हणून काम करतात. त्यांना पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास चिकलठाणा भागात गोवंशची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सकाळी ६ वाजेच्या सुमारास केंब्रिज बायपास परिसरात गोवंश मांसाने भरलेला एक रिक्षा पकडून तो चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन केला. या घटनेनंतर काही वेळातच, त्यांनी पुष्कप गार्डन भागात गोवंश मांसाने भरलेला आणखी एक रिक्षा पकडला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याने पोलिस अंमलदार अंकुश ढगे तिथे आले. रिक्षा पोलिस ठाण्यात पाठवून शेळके आणि अंमलदार ढगे यांनी कुरेशी बंगल्याच्या दिशेने तपासणीसाठी गेले. गल्लीत शिरताच मांसाचा उग्र वास, दुर्गंधी आणि कोंबड्या, बोकड्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तसेच कुरेशी पॅलेससमोर रक्ताचे डाग दिसल्याने त्यांनी विचारपूस करण्याच्या तयारीत असतानाच, घरातून एक टोळके बाहेर आले.
आज इसका काम करदो, दोबारा यहाँ पर नही आणा
गल्लीत जाताच टोळक्याने शेळके आणि अंमलदार ढगे यांना इधर क्या कर रहा, असे म्हणत दमदाटी सुरू केली. आज इसका काम कर दो दोबारा यहाँ पर नही आणा इनो, असे म्हणत हल्ला चढविला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण, काही जणांनी चाकू, कोयत्याने त्यांच्यावर वार केले. शेळके यांच्या पाठीवर वार झाला. एकाने त्यांच्या डोक्यावर वार करताच ते रक्तबंबाळ झाले. अंमलदार ढगे यांनी गाडी काढून शेळके यांना रुग्णालयात दाखल केले. डोक्याला २२ टाके दिले आहेत.
पोलिसांना धक्काबुक्की; वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
पोलिस अंमलदार अंकुश ढगे यांनाही टोळक्याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले, यांनी धाव घेतली होती. मिनी घाटीसमोर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनपाच्या स्वच्छता निरीक्षकावरही हल्ला
याचवेळी परिसरात अस्वच्छतेची तक्रार आल्याने मनपाचे स्वच्छता निरीक्षक सचिन शिंदे हे पाहणीसाठी घटनास्थळी आले होते. शिंदे हे गणेश शेळके आणि पोलिसांचे साथीदार असल्याचा संशय आल्याने टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. शिंदे यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदे यांच्या तक्रारींवरूनही स्वतंत्र गुन्हा दाखल झाला.