

Sambhajinagar divisional commissioner office Protest
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासह विविध मागण्या करत शेकडो शेतकरी, कामगार आज (दि.३०) विभागीय आयुक्तालयात घुसले आहेत. सुरूवातीला या आंदोलकांनी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर हे सर्व आंदोलक अचानक आयुक्तालयात शिरले. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन, महाराष्ट्र अखिल भारतीय शेतमजूर यूनियन यांच्यावतीने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आयोजित करण्यात आली. काही वेळ निदर्शने केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास हे शेतकरी आंदोलक अचानक आयुक्तालयात शिरले.
सध्या तिथे आंदोलकांनी ठाण मांडले असून प्रशासन त्यांच्याशी चर्चा करत आहे. या आंदोलनात माकप जिल्हा सचिव अॅड. कॉ. भगवान भोजने, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, अॅड. सचिन गंडले, कॉ. प्रकाश पाटील, सीटूचे कॉ. अजय भवलकर, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. लोकेश कांबळे, कॉ. अरुण मते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित आहेत.
1. ओला दुष्काळ जाहीर करावा.
2. शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये पीकनुकसान भरपाई देण्यात यावी.
3. रोजगार गमावलेल्या शेतमजुरांना व ग्रामीण-शहरी कामगारांना प्रति कुटुंब ३० हजार रुपये श्रमनुकसान भरपाई मासिक स्वरूपात द्यावी.
4. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी लागू करावी.
5. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करावी.
6. अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुल, बंधारे, तलाव, वीज वितरणाचे रोहित्र व खांब यांच्या दुरुस्तीकरिता विशेष कार्यक्रम राबवावा.
7. ज्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना बाजारभावानुसार मोबदला द्यावा.
8. शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे वाहून गेलेले पशुधन यासाठी बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी.
9. घर व गोठ्यांची पडझड झालेल्या नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
10. शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी व व्यावसायिक शिक्षणाची फी माफ करावी.