

कवठेमहांकाळ : काश्मीरहून सफरचंद घेऊन सांगलीकडे निघालेला ट्रक शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ ट्रॅक्टरला धडकून रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटला. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रक आणि त्यातील सफरचंदाच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये ट्रक व ट्रॅक्टरचे चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधून सफरचंद भरून सांगली मार्केटकडे निघालेला ट्रक (क्र. एचआर ७४ सी ५३३५) शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपाच्या पुढे आला असता, रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला (क्र. एमएच २३ बीएन ९६१४) त्याने उजव्या बाजूने जोराची धडक दिली. या धडकेनंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला.
अपघातानंतर ट्रकमधील सफरचंदाचे बॉक्स व पेट्या रस्त्यावर तसेच परिसरात विखुरल्याने सफरचंदांच्या मालाचे अतोनात नुकसान झाले. तसेच ट्रकचेही मोठे नुकसान झाले. ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.