Chhatrapati Sambhajinagar Theft : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; ३ घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास

न्यू श्रेयनगर, मुकुंदवाडी अन् सातारा परिसरातील घटना
Chhatrapati Sambhajinagar Theft
कपाटाच्या लॉकरचे कुलूप तोडून त्याला असे छिद्र पाडलेले होते.तसेच दरवाज्याचा कोयंडा चोरट्यांनी कापला.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घरफोडी करून २५ तोळे सोने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच, त्याच दिवशी काही अंतरावरील उस्मानपुरा हद्दीतील न्यू श्रेयनगर भागातही चोरट्यांनी बुधवारी (दि. २५) भरदिवसा फ्लॅटचा कोंडा कट करून नऊ तोळे सोने, चांदी व रोकड चोरून नेल्याचे समोर आले. या दोन्ही घरफोड्यांत तब्बल साडेचौतीस तोळे सोने लांबवल्याने खळबळ उडाली आहे. तर मुकुंदवाडीत ब्युटी पार्लर तर सातारा परिसरात व्यापाऱ्याचे घर फोडून दागिने चोरीला गेले. याप्रकरणी उस्मानपुरा, मुकुंदवाडी आणि सातारा पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

फिर्यादी मिलींद रतनलाल संकलेचा (५८, रा. न्यू श्रेयनगर, शरद अपार्टमेंट) हे बीड बायपास येथील एका सोलार कंपनीत नोकरी करतात. बुधवारी सकाळी ९:१५ वाजता ते कामावर गेले, तर सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पत्नी सीमा या घराला कुलूप लावून नेहमीप्रमाणे एक चावी शेजाऱ्याकडे ठेवून त्यांच्या जनरल स्टोअर्स दुकानात गेल्या.

Chhatrapati Sambhajinagar Theft
Bird Water Scarcity : पिल्लांना सोडून जाता येईना... अन् तहानेने जीवही जाईना !

दुपारी १२.५० वाजता घरकाम करणारी महिला येऊन काम आटोपून १.२० वाजता निघून गेली. सायंकाळी ५:४५ वाजता मिलींद घरी परतले. त्यांनी मुख्य लोखंडी दरवाजा उघडला. त्यावेळी आतील लाकडी दरवाजाचा कोयंडा कट केल्याचे दिसले. बेडरूममधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील दागिने ठेवलेल्या लॉकरचे कुलूप तोडून त्याला छिद्र पाडलेले होते.

चोरट्यांनी कपाटातून ४ तोळ्यांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, १ तोळ्याचे डायमंड पेंडलचे मंगळसूत्र, २१ ग्रॅमचे ब्रेसलेट, ८ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ४ ग्रॅमची डायमंडची अंगठी, ५ ग्रॅमचे सोन्याचे तुकडे आणि ४ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन राख्या असे २२ ग्रॅम सोने लंपास केले. यासोबतच चांदीचे शिक्के, पैंजण, जोडवे आणि २० हजाराची रोकड चोरून नेली. उस्मानपुरा पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करून पाहणी करत पंचनामा केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत सुपेकर करत आहेत.

दरम्यान, अर्टिगा कारमधून आलेल्या पाच चोरट्यांनी गाडीचे इंजिन चालू ठेवून, अवघ्या १५-२० मिनिटांत इलेक्ट्रिक पकडच्या सहाय्याने न्यू श्रेयनगरातील घर फोडून पारंपरिक व लग्नाचे दागिने लंपास केले. उल्कानगरीतील घरफोडीच्या दिवशीच ५-७ मिनिटांच्या अंतरावर ही दुसरी चोरी केली.

Chhatrapati Sambhajinagar Theft
Ranganubhuti Theatre Festival: कलाकारांचा आत्मा एकच; ‘रंगानुभूति’ नाट्य महोत्सवात प्रयोगकर्मींचा सन्मान

मुकुंदवाडीत कुटुंबाला खोलीत कोंडून पार्लरवर डल्ला

लायन्स क्लब कॉलनीतील मीनाक्षी परमेश्वरी (४१) या मंगळवारी (दि. २४) रात्री गेट व ब्युटी पार्लरला कडी लावून शेजारील खोलीत झोपल्या होत्या. पहाटे साडेपाचला उठल्यावर खोलीला बाहेरून कडी लावल्याचे दिसले. मुलगा रोहितने मागील दरवाजाने येऊन कडी उघडल्यावर पार्लरमधील मेकअप किट, बैटेक्स व हळदीचे दागिने, कपडे, पर्स आणि चांदीचे ब्रेसलेट असा ३० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सपोनि रोहित गांगुर्डे तपास करत आहेत.

सातारा परिसरात व्यापाऱ्याचे घर फोडून दागिने लंपास

ज्योतीनगर, अहिल्याबाई होळकर चौकातील किराणा व्यापारी पारशराम चौधरी (४३) हे १३ नोव्हेंबरला घराला कुलूप लावून सहकुटुंब राजस्थानला गेले होते. २३ नोव्हेंबरला शेजारी तेलंगाणा यांनी मधला दरवाजा तुटल्याची माहिती दिली. २४ नोव्हेंबरला चौधरी परतले असता चोरट्यांनी कपाटातून चांदीचा कंबरबेल्ट, पायल, सोन्याची अंगठी आणि बाळी असा १ तोळा सोने व ६५० ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले. हवालदार देविदास काळे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.