वैजापूर : शाळेतून घरी जात असलेल्या ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांला वाळू तस्करी करणाऱ्या हायवाने चिरडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२०) दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील लाडगाव परिसरात घडली. दरम्यान, घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वाळू माफिया व पोलिसावर संताप व्यक्त करत चक्क हायवा पेटवून दिल्याने परिसरात तनाव निर्माण झाला. साईनाथ रामनाथ निंबाळकर (वय ११) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर साईनाथ घरी जात लाडगाव बस स्टॅन्डजवळ पाठीमागून आलेल्या हायवा ट्रकने त्याला जोराची धडक दिली . हा अपघात एवढा भीषण होता की, मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर उपस्थित जमावाने हायवा पेटवून देऊन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. तसेच अपघातानंतर हायवा चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकल्याने ग्रामस्थांनी पोलीस जोपर्यंत चालक मालकास अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामूळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.