पिंपळगाव बसवंत : येथील वणी चौफुली उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (दि. १९) पहाटे 4 च्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला.
पिंपळगाव बसवंत येथील उड्डाणपुलाजवळ रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांदवडकडून पिंपळगावकडे येणाऱ्या लक्झरी बसने (एआर ०१ आर ००२७) चांदवडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ०४ एफजे ६८८७) जोरदार धडक दिली. त्यात ट्रकचा क्लीनर अबुजफर रफिक अहमद (२३, रा. मालेगाव) जागेवरच गतप्राण झाला, तर बसचालक अजमेरी युसुफ शहा याचा नाशिकमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. लक्झरीच्या जोरदार धडकेमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविली. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.