Sambhajinagar News : आता आगार प्रमुख सकाळीच गाठणार बसस्थानक
Chhatrapati Sambhajinagar ST Bus News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगार प्रमुखांना कार्यालयीन कामाच्या वेळेत येणे अंगवळणी पडले आहे. आता भल्या पहाटे उठून बसस्थानक गाठावे लागणार आहे. त्यांना आगारातून सुटणाऱ्या बसच्या पहिल्या फेरीपासून सकाळच्या सत्रातील सर्व बस सुटेपर्यंत उपस्थित राहावे लागणार आहे. हे कर्तव्य प्रत्येक सोमवारी करावे, असे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
प्रत्येक आगारातून लांब व मध्यम पल्ल्याच्या बस या वेळेवर जात नसल्याचे याचा एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे या बस वेळेत सोडण्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आगार प्रमुखांनी आगारांतून सुटणाऱ्या पहिल्या बसच्या फेरीपासून सकाळच्या सत्रात जेवढ्या बस सुटणार आहेत, त्यांच्या वेळेचे नियोजन करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता आगार प्रमुखांना दर सोमवारी सकाळी ४.३० ते ५ वाजताच बसस्थानक गाठावे लागणार आहे.
स्वच्छताही तपासण्याचे आदेश
आगार व्यवस्थापकांनी केवळ वेळेचे नियोजन नाही तर बस किती वाजता प्लॅटफॉर्मवर लागली, बस स्वच्छता, चालक-वाहक वेळेत उपस्थित होते का याबाबत तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन स्वतः आगार प्रमुखांनी करावे, तसेच विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनीही आकस्मित तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
...अन्यथा कारवाई
या कामाचा तपशील आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांच्याकडे नोंदवहीत नोंदवायचा आहे. याबाबत महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. या नियमांची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

