

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असतानाच उन्हाचा चटकाही वाढला आहे. विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांवरील ताण वाढत असताना आता ढगाळ वातावरणासह नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्याला आता पावसाची प्रतीक्षा असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती पाऊस पडतो, यावरच दुष्काळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता अवलंबून असणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
ढगाळ वातावरणाची शक्यता असली, तरी सध्या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र एक ते सात नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्यासह पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमान सरासरीइतके, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.