Chhatrapati Sambhajinagar Cyber attack on Bajaj Hospital | बजाज हॉस्पिटलवर सायबर हल्ला

९ सर्व्हर हॅक करून चोरला डेटा, खंडणीसाठी सिस्टीम केली लॉक : क्रिप्टो २४ ग्रुपने नोटपॅडवर सोडली धमकी; ७ दिवसांत पैसे न दिल्यास डार्क वेबवर डेटा लीक करण्याचा इशारा
Chhatrapati Sambhajinagar Cyber attack on Bajaj Hospital | बजाज हॉस्पिटलवर सायबर हल्ला
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील कमलनयन बजाज हॉस्पिटलवर 'क्रिप्टो२४ ग्रुप' या आंतरराष्ट्रीय सायबर हॅकर्सच्या टोळीने रॅन्समवेअर' सायबर हल्ला चढवल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ वाजता उघडकीस आली. हॅकर्सने रुग्णालयाच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये घुसखोरी करून सर्व ९ मुख्य सर्व्हर पूर्णपणे हॅक केले असून, रुग्णांचा व व्यवस्थापनाचा अत्यंत संवेदनशील डेटा चोरला आहे. डेटा परत करण्यासाठी आणि सर्व्हरवरील लॉक उघडण्यासाठी हॅकर्सने खंडणीची मागणी केली असून, पैसे न दिल्यास संपूर्ण डेटा डार्क वेबवरील 'टॉर' साईटवर लीक करण्याची धमकी दिली आहे.

या अचानक झालेल्या सायबर हल्ल्यामुळे रुग्णालयाची संगणकीय प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली असून, तपासण्या, बिले, इन्शुरन्स आणि औषध वितरणाची कामे खोळंबल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात सायबर टोळीविरुद्ध सोमवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलनयन बजाज रुग्णालयाचे आयटी विभाग प्रमुख प्रशांत प्रभात पांडे (३६, रा. बजाज क्वार्टर्स, ईटखेडा) यांच्या तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालयाच्या बिलिंग विभागातून रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांचा तातडीचा फोन आला. हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अचानक बंद पडली असून रुग्णांची बिले तयार करता येत नाहीत, असा निरोप देण्यात आला.

पांडे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन सर्व्हर रूम गाठली. त्यांनी एचएमआयएस लिंक तपासली असता ती डाऊन होती. सव्र्व्हर तपासले असता 'Access Denied असा मेसेज आला, एवढेच नव्हे, तर नेटवर्क सुरक्षेसाठी असलेली 'फायरवॉल' तपासली असता त्यावरील सर्व प्रशासकीय नियंत्रणही लॉक झाल्याचे निष्पन्न झाले. संशय बळावल्याने त्यांनी रुग्णालयाचे सोफोस' अँटीव्हायरस उघडून त्याचे व्हायरस लॉग्स तपासले असता, रुग्णालयाच्या सर्वच्या सर्व ९ सर्व्हरवर धोक्याचे लाल ठिपके चमकत असल्याचे दिसले.

आम्ही क्रिप्टो २४ ग्रुप...

सर्व्हरची छाननी सुरू असतानाच संगणकाच्या स्क्रीनवर नोटपेंड फाइल उघडली गेली, ज्यामध्ये हॅकर्स टोळीने आम्ही क्रिप्टो२४ ग्रुप आहोत. तुमच्या सर्व फाईल्स आम्ही एन्क्रिप्ट (लॉक) केल्या असून तुमचा डेटा चोरला आहे असा धमकीचा संदेश सोडला. आम्ही तुमच्या अंतर्गत नेटवर्कमधून सर्व संवेदनशील डेटा यशस्वीरीत्या बाहेर काढला आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमच्याकडे ३ दिवसांची मुदत आहे; त्यानंतर खंडणीची किंमत वाढेल. जर ७ दिवसांत प्रतिसाद दिला नाही, तर तुमचा सर्व डेटा आमच्या टॉर लीक साईटवर प्रसिद्ध केला जाईल. तसेच हॅकर्सने फाईल डिक्रिप्ट करून देण्याचा पुरावा म्हणून १ एमबीची फाईल मोफत उघडून देण्याची तयारी दर्शवत, कोणत्याही बाहेरील रिकव्हरी तज्ज्ञावर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही या मेसेजमध्ये दिला होता.

रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर

या सायबर हल्ल्यामुळे कमलनयन बजाज रुग्णालयाची संपूर्ण डिजिटल कार्यप्रणाली कोलमडून पडली. रुग्णालयाच्या एचएमआयएस प्रणालीमध्ये रुग्णांचे आजार, उपचार, विविध चाचण्यांचे अहवाल, औषधांचा साठा आणि मेडिक्लेम/ इन्शुरन्सचा सर्व डेटा असतो. सर्व्हर लॉक झाल्यामुळे डॉक्टरांना संगणकावर रुग्णांचा इतिहास पाहणे, औषधे लिहून देणे, प्रयोगशाळेतील तपासण्यांचे निष्कर्ष मिळवणे आणि डिस्चार्जची प्रक्रिया पार पाडणे अशक्य झाले. संगणकीय बिले तयार न झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दाखल करून घेताना व औषधे देताना प्रशासनाची मोठी कसरत झाली, ज्यामुळे शेकडो रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

Chhatrapati Sambhajinagar Cyber attack on Bajaj Hospital | बजाज हॉस्पिटलवर सायबर हल्ला
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर हादरलं! भरधाव कंटेनर अचानक गणपती मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू, 12 जखमी

'सर्ट-इन'ला अहवाल

सायबर हल्ला झाल्याची खात्री पटताच रुग्णालय प्रशासनाने केंद्र सरकारच्या संगणकीय आणीबाणी प्रतिसाद पथकाला म्हणजेच 'सर्ट-इन'ला तात्काळ संपर्क साधून सर्व तांत्रिक अहवाल सादर केला. त्यानंतर अंतर्गत पातळीवर सव्र्व्हर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करत २६ ऑक्टोबर रोजी रात्री सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास सायबरचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, साताऱ्याचे निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे हे करत असून, हॅकर्सने वापरलेल्या आयपी अॅड्रेस आणि डार्क वेब लिंकचा माग काढण्यासाठी राज्य सायबर सेलची मदत घेतली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Cyber attack on Bajaj Hospital | बजाज हॉस्पिटलवर सायबर हल्ला
Graduate Constituency Election- छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news