

Chhatrapati Sambhajinagar political Former Mayor Rashid Mamoo Chandrakant Khaire
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
ठाकरे सेनेत प्रवेश घेतलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ रशीद मामू हे सोमवारी खैरे यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनवर पोहोचले. चंद्रकांत खैरे हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र खैरे यांनी लगेचच त्यांना झिडकारून लावले.
रशीद मामू हे दंगेखोर आहेत, त्यांनी १९८६ साली सिटी चौक मशिदीतून शिवसेनेच्या मोर्चावर दगडफेक केली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असे खैरे यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने माजी महापौर रशीद मामू यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री निवास्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. मात्र आता या प्रवेशावरून ठाकरे सेनेतच विरोध सुरू झाला आहे.
ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांच्या प्रवेशावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यात रशीद मामू हे सोमवारी पक्षाच्या मुलाखतीसाठी शिवसेना भवन येथे पोहोचले. त्याचवेळी समोरून चंद्रकांत खैरे तिथे आले. खैरे यांची नाराजी दूर करण्याच्यादृष्टीने रशीद मामू हे त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरसावले, परंतु खैरे यांनी त्यांना झिडकारून लावले. माझा तुम्हाला विरोध आहे, असे म्हणत खैरे यांनी त्यांना झिडकारून लावले. त्यानंतर खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना रशीद मामू यांना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळू देणार नाही, असा दावा केला.
खैरे यांनी सांगितली आपबिती
खैरे यांनी शिवसेनेच्या मोर्चावर त्यावेळी झालेल्या दगडफेकीची माहिती दिली. ते म्हणाले, समान नागरी कायदा झालाच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेने १९८६ साली क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चात दीडशे रिक्षाचालक सहभागी झाले होते. मोर्चा सिटी चौकात पोहोचला, तेव्हा याच रशीद मामू यांनी मशिदीतून मोर्चावर दगडफेक केली. त्यानंतर दंगल भडकली. पोलिसांनी शिवसेनेच्या सुभाष पाटील यांना अटक करून अकोल्याच्या तुरुंगात डांबले. नंतर आम्ही तक्रार दिल्यावर रशीद मामू यांनाही रासुका खाली अटक झाली. आता त्याच रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश देणे चुकीचे आहे, असे खैरे म्हणाले.
त्यांना उद्धव साहेबांनी शिवबंधन बांधले
खैरे यांच्या नाराजीविषयी अंबादास दानवे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, मला एवढेच माहिती आहे की, रशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे. खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी काहीही बोलणार नाही.
पन्नास हजार हिंदू मतांचे नुकसान
उद्धव ठाकरे यांना रशीद मामू यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती. अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना ती माहिती दिली नाही. मलाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे हा प्रवेश झाला. मला किती तरी लोकांचे फोन येत आहेत, अशा माणसाला कसे घेतले, अशी विचारणा ते करत आहेत, रशीद मामूला पक्षात घेतल्यामुळे पक्षाचे पन्नास हजार हिंदू मतांचे नुकसान झाले आहे, असा दावा खैरे यांनी केला.