

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेला पोलिसाच्या नातेवाइकाचा जुगार अड्डा अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.८) रात्री बाराच्या सुमारास जालना रोडवरील चेतन ट्रेंड सेंटर येथे करण्यात आली. २५ जणांविरुद्ध जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल करून १८ मोबाईल, ४५ हजार २८० रुपयांची रोख असा २ लाख ३८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, हा जुगार अड्डा एका पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाइकाचा असून जय इंगळे याने तो शकील खान अकबर खान (रा. चंपा चौक) याला चालवायला दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील चेतन ट्रेंड सेंटर येथे जय एस. इंगळे मित्रमंडळ सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह धाव घेऊन छापा मारला. पोलिसांना पाहून १० ते १२ जण गेले. २३ जण हाती लागले. सर्व जण तिर्रट नावाचा जुगार खेळताना हा क्लब जय इंगळे आणि शकील खान दोघे पार्टनरशिपमध्ये चालवत असल्याचे उघड झाले.
तिथे तीन जुगाऱ्यांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना वेगवेगळ्या रंगाचे व मूल्याचे क्वॉईन देऊन चलनी स्वरूपात वापर दाखवून पत्त्याचा क्लब चालवत होते. तर रात्रभर जुगाऱ्यांच्या सोयीसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था आणि दिमतीला तीन वेटरही होते. सहा राऊंड टेबल टाकून जुगार सुरू होता. रात्री बारा वाजता सुरू झालेली कारवाई दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू होती. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सपोनि रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल मस्के, अंमलदार पठाण, जाधव, धर्मे, नितेश सुंदर्डे, लांगडे यांनी केली.
अर्जुन बहिरे, सय्यद बशीर, बलजीत सिंग, युवराज चौहान, हुजेर शेख, शौकत अली, रामचंद्र मैत्रे, शेख अख्तर, शेख मुरशीद, रईस खान, मोहन चांडक, राजेश विठोरीये, नीलेश बर्डे, एजाज खान, जब्बार शेख, चरणदास बुरकुल, शेख असद, ज्ञानोबा धाडगे, अमर मोरे, धनंजय रासने, आनंदकृष्ण भिलडा, हमजान खान, सागर कराड अशी जुगाऱ्यांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक गौता बागवडे यांनी जुगार अडूयाबाबत विचारणा केली. तेव्हा क्लब चालकाकडून एक वकील समोर आला. त्याने सोशल क्लब असून कोर्टाची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र सोशल क्लबचे नियम, खेळणाऱ्यांकडे ओळखपत्र, पैसे देऊन क्वॉईनवर जुगार सोशल क्लबच्या कोणत्या नियमात आहे, असे म्हणत गीता बागवडे यांनी फैलावर घेताच त्याला एकही पुरावा देता आला नाही.