

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहारत गुन्हेगारांची मुजोरी एवढी वाढली की, त्यांना आता खाकी वर्दीचा कसलाही धाक उरलेला नाही! आज जेलमध्ये गेलो तरी उद्या वेलवर बाहेर येईन, अशी गुर्मी दाखवत एका तडीपार गुंडाने आणि त्याच्या साथीदारांनी थेट पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तुम्हा सर्वांना उभ्याने चिरून टाकतो, अशी थेट धमकी देत या सराईत गुंडाने पोलिसांवर सुरा उपसला, एका कर्मचाऱ्याचा अक्षरशः चावा घेतला आणि दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला.
ही घटना बुधवारी (दि.२५) रात्री भावसिंगपुरा येथील आमेन चौकात घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तडीपार गुंड ईश्वर चव्हाण याच्यासह ७जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वरसह पायल, शीला आणि अंजली या चौघांना अटक करण्यात आली असून २८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती छावणी ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.
छावणी पोलिसांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली होती की, शहरातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार ईश्वर राजू चव्हाण हा भावसिंगपुरा येथील आमेन चौकात उजळमाथ्याने फिरत आहे. या माहितीवरून हवालदार महाशंख दांडगे, उपनिरीक्षक हाके आणि त्यांचे पथक तातडीने तिथे पोहोचले.
तिथे ईश्वर चव्हाण आढळून आला. हद्दीत घुसखोरी का केली? अशी विचारणा करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याचे नातेवाईक सचिन त्रिभुवन, विकास भालेराव यांच्यासह महिला आर-ोपींनी तिथे धाव घेत पोलिसांनाच घेरले. त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत थेट पोलिसांच्या गाडीची चावीच हिसकावून घेतली
पाच दिवसांत तिसरा हल्ला
गुन्हेगारांची मजल आता पोलिसांचे रक्त सांडण्यापर्यंत गेली आहे. गेल्या अवघ्या पाच दिवसांत शहरात पोलिसांवर हल्ला होण्याची ही तिसरी संतापजनक घटना आहे. याआधी हायकोर्ट सिग्नलवर एका दाम्पत्याने वाहतूक पोलिसावर हात उगारला होता, तर सिडकोत एका रिक्षाचालकाने अंमलदाराला मारहाण करून वर्दी फाडली होती. आता थेट सुरा घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या गुंडांची हिंमत वाढली आहे
हे आहेत आरोपी
ईश्वर राजू चव्हाण (हद्दपार गुंड), सचिन त्रिभुवन, विकास भालेराव, शकुंतला चव्हाण, अंजली चव्हाण, शीला त्रिभुवन आणि पायल त्रिभुवन (सर्व रा. भीमनगर, भावसिंगपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर हा खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेला सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक काकासाहेब नागावे करत आहेत.
पोलिसांना घेरून टोळक्याचा हल्ला
गुंडांच्या टोळक्याची आक्रमकता पाहून पोलिसांनी जादा कुमक मागवली, पण तोपर्यंत कायदा हातात घेतलेल्या ईश्वर चव्हाण आणि सचिन त्रिभुवन यांनी मुज-ोरीचा कळस गाठत पोलिस कॉन्स्टेबल खान यांना बेदम मारहाण केली आणि त्यांची बनियान फाडली. एवढ्यावरच न थांबता, ईश्वर चव्हाणने अंमलदार सूर्यवंशी यांच्या डाव्या हाताचा जोरात चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले.
तुझा मर्डरच करतो म्हणत उपसला सुरा !
जेव्हा या गुंडाला पकडून पोलिस गाडीत कोंबण्याचा प्रयत्न सुरू होता, तेव्हा त्याने खाकीलाच खुले आव्हान दिले. मी आताच मर्डर केसमधून बाहेर आलोय, तुम्हा सर्व पोलिसांना उभ्याने चिरून टाकतो, अशी दहशत माजवणारी धमकी त्याने दिली.
स्वतःजवळील मोठा लोखंडी सुरा काढून त्याने फिर्यादी हवालदार दांडगे यांच्यावर सपासप वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दांडगे यांनी तो वार चुकवला, पण त्याच क्षणी सचिन त्रिभुवन याने मागून येऊन दांडगे यांच्या डोक्यात मोठा दगड मारून जखमी केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पोलिसांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी सचिनने स्वतःच्याही डोक्यात दगड मारून घेत नौटंकी केली.