

Chhatrapati Sambhajinagar Pay compensation for airport expansion land
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या सिडको आरक्षित मूर्तिजापूर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या १२.५० टक्के विकसित भूखंड विस्थापित शेतमालकांना मिळण्यासाठी बुधवारी (दि.१८) मुकुंदवाडी गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सिडको प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सन १९७२ पासून सिडकोने मूर्तिजापूर येथील आरक्षित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यास सिडको चाल ढकल करत आहे. यासंबधी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदने देऊन, मागणी करूनही सिडकोतील अधिकारी या निर्णयास टाळाटाळ करत आहेत.
तसेच विमानतळ विस्थापित शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यानुसार ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह खंडपीठाने दिलेले आदेश पारित करण्यात यावेत, तसेच शासनातर्फे आदेशही देण्यात आलेले आहेत. मात्र नगर विकास सचिव व सिडकोच्या अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदे शाप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावर सिडको प्रशासनाने अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे मुकुंदवाडी गावातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याने छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकारणासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या १२.५० टक्के विकसित भूखंड विस्थापित शेतमालकांना देण्यात यावा, अशी मागणी उत्तमराव खोतकर, साळूजी ठुबे, आत्माराम ठुबे, गंगाधर गायकवाड, देविदास जगताप, बंडू ठुबे, गणेश खोतकर, शे-षराव ठुबे, प्रकाश साळवे आदीं शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.