

Shri Sant Eknath Maharaj Palkhi ceremony enters Ahilyanagar district
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम चनकवाडी (ता. पैठण) येथील पंचक्रोशीत झाल्यानंतर सोहळा गुरुवारी (दि.१९) दुपारी मुंगी (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथे दाखल झाला. अहिल्यानगर जिल्हा प्रशासन व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात वारकऱ्यांचे स्वागत केले आहे.
आषाढी वारी सोहळ्यासाठी बुधवारी श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. या सोहळ्याचा पहिला मुक्काम चनकवाडी पंचक्रोशीत झाला. गावकऱ्यांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांची भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेची पाहणी पैठण तहसीलदार दिनेश झांपले यांनी केली. गुरुवारी सकाळी पालखी सोहळा पाटेगाव, दादेगावमार्गे दुपारी मुंगी येथे दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झाला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करून नाथांच्या अधिकारी राहुल शेळके, प्रांत अधिकारी प्रसाद मते, गटविकास अधिकारी सोनाली शहा, सहाय्यक गटविकास अधिकारी बांगर, तहसीलदार कारखिले, मुंगी येथील सरपंच लता राजेंद्र ढमढेरे, ग्रामविकास अधिकारी राजेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. नाथ पादुकाची आरती झाल्यानंतर पालखी सो-हळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्यासह वारकऱ्यांचे स्वागत केले. सायंकाळी हा पालखी सोहळा दुसरा मुक्कामासाठी हादगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथे मुक्कामासाठी दाखल झाला आहे.
चनकवाडी येथील सरपंच भगवान कबाडी, गोरख मोहिते, संतोष बोठे, बाबासाहेव मडके, भाऊ वाघमारे, कल्याण कदम, हरिभाऊ बावने, ग्रामसेवक पाटील, झेंडे, गोपाल महाराज चव्हाण, लक्ष्मण भोसले, लहू नरोडे, भैय्या मोहिते, रामेश्वर बावणे यांच्यासह विविध गावांतील नागरिकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करत दर्शन घेतले.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम हादगाव येथे होता. सोहळा शुक्रवारी (दि.२०) सकाळी बोधेगाव, बालमटाकळी, बाडगव्हाण, लाड जळगाव, शेकटामार्गे तिसऱ्या मुक्कामासाठी संत भगवानबाबा यांच्या गडाच्या पायथ्याशी असलेले कुंडलपारगाव या ठिकाणी दाखल होणार आहे.